मुंबई । राज्यात सत्तास्थानी विराजमान होऊन जवळपास तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. मात्र तरीही राज्य सरकारमधील सर्वच मंत्री आग्रही पध्दतीने काम करत नसल्याचे जाणवत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राज्य सरकारने घेतलेले निर्णय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठोसपणे प्रयत्न करावेत असे, स्पष्ट आदेश भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती या बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
संपूर्ण देशभरातील राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी 95 दिवसीय देशव्यापी दौर्यावर निघालेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे आज (शुक्रवारी) मुंबईत आगमन झाले. अमित शहा हे महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौर्यावर आले असून आजपासून तीन दिवस ते मुंबईतच भाजप कार्यकर्ते, मंत्री, मित्रपक्ष आणि प्रदेश पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी अमित शहा यांनी राज्यातील प्रदेश पदाधिकारी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि मित्रपक्ष व भाजपच्या आमदारांची बैठक घेतली.
काय घडलं बैठकीत?
राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या कामाचे कौतुकही अमित शहा यांनी यावेळी केले. तसेच इतर मंत्र्यांकडून म्हणाव्या त्या प्रमाणात राज्यातील जनतेला नजरेसमोर ठेवून काम करत नसल्याचे दिसून येत असल्याबाबत अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची ठोसपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातील अधिकार्यांवर जास्त विसंबून राहू नये. त्यासाठी स्वतःच पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी या बैठकीत दिल्याचे त्या मंत्र्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपसाठी चांगले राजकीय वातावरण निर्माण होत असून हे वातावरण कायम रहावे यासाठी सर्वच मंत्र्यांनी अंग मोडून मेहनत घ्यावी. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत राज्य सरकारचा निर्णय पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही अमित शहा यांनी दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर सर्व मंत्र्यांनी पक्षवाढी आणि संघटना वाढीच्या आपल्या शासकीय कामाचे संतुलन ठेवण्याचे निर्देशही अमित शहा यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांना दिले आहेत.
मित्रपक्षांनी व्यक्त केली नाराजी
राज्यातील भाजप मंत्र्यांच्या पाठोपाठ राज्य सरकारमधील सहभागी असलेल्या मित्रपक्षांची बैठक अमित शहा यांनी घेतली. या बैठकीला शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे, रिपाईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष तथा पदुम मंत्री महादेव जानकर आणि जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपबरोबर महायुती करून आणि सत्तेत येऊन अडीच ते तीन वर्षे झाले. मात्र भाजपने मित्रपक्षांना दिलेला राजकीय शब्द अद्याप पूर्ण केला नाही. त्याचबरोबर काही प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते महत्वाचे प्रश्नही अद्याप सोडवण्यास प्राथमिकता दिली नसल्याबद्दल सर्वच मित्र पक्षांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये प्रामुख्याने रासप मंत्री महादेव जानकर, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांचा समावेश असल्याची माहिती मित्रपक्षातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.