मंत्र्यांपुढे अधिकारी बनले मुजोर!

0

भाईंदर । राज्याच्या कृषी राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला महापौरांसह आमदार, नगरसेवक आणि पालिकेच्या अधिकार्‍यांनी रविवारी दांडी मारली. मीरा-भाईंदर महापालिकेने सुरु केलेल्या संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. मात्र यावेळी माजी महापौर गीता जैन यांच्याखेरीज महापौरांसह, आमदार, नगरसेवक व एकही पालिका अधिकारी उपस्थित नसल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी काहीच पालिका कर्मचार्‍यांनी उपस्थिती दाखविली होती. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे, अन्नपुर्णा कृषी उत्पन्न खरेदी-विक्री व उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मीरारोड येथील बाजारापासुन कृषीमंत्र्यांनी आठवडे बाजाराला सुरुवात केली. माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका गीता जैन यांच्याखेरीज एकही लोकप्रतिनिधी व पालिका अधिकारी उपस्थित नव्हते. उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली असली तरी शेतकर्‍यांप्रती अनास्था दाखविणार्‍यांकडे दुर्लक्ष करुन कृषीमंत्र्यांनी पालिकेने शेतकर्‍यांसाठी अधिकाधिक जागा उपलब्ध करुन दिल्यास आठवड्यातून किमान दोन दिवस बाजार सुरु केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोफत जागेची केली उपलब्धता
राज्य सरकारच्या सुचनेप्रमाणे पालिकेने वर्षभरापुर्वी संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी मंडळाला शेतीमाल विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळच्या महासभेत तसा ठरावही मंजुर करुन तो राज्याच्या पणन विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला. परंतु, त्या मंडळाची पणन विभागाकडे नोंदच नसल्याने विभागाने सुरुवातीला त्याला अमान्य केले होते. प्रस्ताव पणन विभागाकडे गेल्यानंतर विभागाकडे नोंदच नसल्याने सुरुवातील अमान्य झालेला प्रस्तावाला मंडळाने नोंदणी केल्यानंतर विभागाने त्याला मान्यता दिली. त्यामुळे मंडळाचा शेतकरी आठवडा बाजर सुरु करण्याचा मार्ग सुकर झाला. यानंतर पालिकेने या मंडळाला मीरारोडच्या रामदेव पार्क परिसरातील पालिकेच्या नियोजित मीनाताई ठाकरे मंडईच्या मोकळ्या जागेसह भाईंदर पश्‍चिमेकडील पालिकेचे स्थानिक संस्था कर विभागाचे कार्यालयात मोफत जागा उपलब्ध करुन दिली.

मोजक्याच निमंत्रण पत्रिका छापल्याचा आरोप
या कार्यक्रमासाठी मोजकीच निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असली तरी त्याला मात्र व्यापक प्रसिद्धी देण्याचे प्रशासनाकडून टाळण्यात आल्याचा आरोप नागरीकांकडुन करण्यात आला. तसेच शहरातील बचतगटांचाही त्यात समावेश करुन त्यांना पाकीटबंद पदार्थांची विक्री करता येऊ शकत असल्याची सुचना केली. यामुळे बचतगटांना आर्थिक फायदा होणार असल्याने त्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी गीता जैन यांना दिले. जैन यांनी केलेल्या भाषणात महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ केवळ बाजारात न विकता ते घरोघरी विकल्यास त्यांना फायदा होईलच. परंतु, ग्राहकांना घरपोच वस्तु मिळाल्यास त्यांची बाजारातील पायपीट वाचणार असुन अशा बचतगटांना सरकारच्या माध्यमातुन पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलिप बाबड यांच्यासह ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, पणन अधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले सदाभाऊ खोत
शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजाराला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शेतकर्‍यांना आपल्या शेतमालाची सरळ विक्री करता येत असल्याने त्यांचाही फायदा होतो आहे. त्यामुळे या बाजाराला अधिकाधिक जागा उपलब्ध करून देत आठवड्यातून किमान दोन दिवस बाजार भरवल्यास शेतकर्‍यांचा आणि ग्राहकांचा दोघांचाही फायदा होईल, असे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.