मंदाणे । शहादा तालुक्यातील पूर्वभागातील मंदाणे (इंदिरा नगर पासून) ते घोडलेपाडा हा रस्ता पंचायत समिती अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेले मटेरिअल व कामाची गुणवत्ता दिसत नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्या कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शहादा तालुक्यातील मंदाणे येथून 3 ते 4 किमी अंतरावरील घोडलेपाडा या आदिवासी खेड्याकडे जाणार्या रस्त्याचे प्रथम 600 मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमध्ये मातीचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर पुरेसा थरही टाकलेला दिसत नाही. रस्त्यावर दगड युक्त मुरूम टाकले जात आहे. यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करणार्या शेतकरी बांधवांकडून रस्त्याचा कामाच्या दर्जा व गुणवत्ताबाबत नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावर करण्यात येत असलेल्या प्रत्येक कामांची नेहमी हीच अवस्था असल्याने व पंचायत समिती बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही वर्षांपूर्वी नाल्यांवर बांधण्यात आलेल्या पाईप मोरीचे बांधकाम पाहिल्यावर याची प्रचिती येईल. त्या पाइप मोरीवर अजूनही संरक्षण कठडे बांधण्यात आले नाही. त्याजागी फक्त लोखंडी सळ्या उभ्या आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी काम या रस्त्यावर होत असल्याने शेतकरी बांधव संताप व्यक्त करत आहेत. या रस्त्यावर पहिले कोणतेही काम केले जाते, नंतर त्या कामांचे फलक लावण्यात येते. त्या कामाचे बिल ठेकेदारास मिळाल्या नंतर ते फलक काढून नेण्यात येतात. ते फलक कुठे गायब होतात हे सुध्दा अनुत्तरीतच आहे.
दरम्यान, सध्या होत असलेल्या कामाची गुणवत्ता किती दिवस टिकेल, रस्ता बांधकाम किती दिवस टिकेल यात शंका उपस्थित केली जात आहे. म्हणून कामाचा दर्जा सुधारण्याकडे संबंधित ठेकेदार आणि शहादाच्या पंचायत समितीच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.