मंदाणे येथे पुरवठा विभागाकडून भरड धान्य खरेदी सुरू

0

शहादा:तालुक्यातील रब्बी हंगामातील भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा मका, ज्वारी धान्यांची शासनाकडून मंदाणे व शहादा येथे नुकतीच खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु भरड धान्यात फक्त मका व ज्वारीचीच खरेदी शासनाकडून होत असल्याने बाजरीची खरेदी शासनाने तात्काळ सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील बाजरी उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे.

शहादा तालुक्यातील मंदाणे येथे आदिवासी उपयोजना अंतर्गत आणि शहादा येथे बिगर आदिवासी उपयोजना अंतर्गत भरड धान्य खरेदी केंद्र सरकारने नुकतेच सुरू केले. मंदाणे येथे आदिवासी उपयोजनेच्या एकाधिकार खरेदी केंद्रात हे खरेदी केन्द्र सुरू करण्यात आले. खरेदी केंद्राचा शुभारंभ आदिवासी उपयोजनेचे चेअरमन बी.जी.पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर मोरे, शहादा उपप्रादेशिक कार्यालयाचे प्रतवारीकर एन.बी.पावरा, वरिष्ठ सहाय्यक बी.एन.जमादार,कर्मचारी रवींद्र पाटील व शेतकरी उपस्थित होते.

सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीत बळीराजा सर्वच बाबतीत आसमानी संकटात सापडला आहे.शासनाकडून सर्वच पिकांना चांगला हमीभाव मिळेल या विचाराने बळीराजाने खरीप तथा रब्बीत घेतलेले पिकं साठवून ठेवले होते. परंतु संपूर्ण जगात “कोरोना” आजाराने घातलेल्या थैमानाने बळीराजाच्या सर्वच आशा सीमित झाल्या. कोरोनामुळे घेतलेले उत्पन्न बाजारात पेठा बंद करण्यात आल्याने विक्रीसाठी कसे न्यावे ही मोठी समस्या निर्माण झाली. एप्रिल संपला मे महिना सुरू झाला तरी तयार झालेला माल कसा विकावा ही मोठी समस्या बळीराजापुढे निर्माण झाली. लॉकडाऊनमध्ये शासनाने आपला माल खरेदी करण्यासाठी उपाय योजना कराव्यात याबाबतची मागणी सर्वत्र शेतकरी वर्गाकडून होऊ लागली. त्याची दखल घेत शासनाने सीसीआयमार्फत कापूस व पणन विभागामार्फत भरड धान्य सुरू केले. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस विक्री चांगला भाव मिळेल या उद्देशाने बाकी होती. वारंवार मागणी झाल्याने शेवटी लॉकडाऊनकाळात मे महिन्याच्या सुरुवातीला सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू झाली. अशीच परिस्थितीत भरड धान्याबाबतही दिसून आली. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले वाहू लागले. बंद पडलेल्या विहिरी जिवंत झाल्या.त्यामुळे खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया जरी गेला तरी मात्र विहिरींना पुरेसे पाणी असल्याने रब्बी हंगाम चांगला आला. त्यात शेतकऱ्यांनी गहू, मका,बाजरी, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले. परंतु जेव्हा शेतातून माल घरी आला तेव्हा मात्र कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठ बंद करण्यात आल्या. घरी आलेला माल घरीच पडून होता. लॉकडाऊनमुळे आपला माल कसा विकला जाईल, पुन्हा आपल्यावर आसमानी संकट उभे तर राहणार नाही ना? या विचाराने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला. याबाबत पुन्हा एकदा शासनस्तरावर मागणी करण्यात आली.त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने भरड धान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहादा तालुक्यात आदिवासी व बिगर आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांकडून भरड धान्य खरेदी नुकतीच सुरू करण्यात आली आहे.त्यात मका व ज्वारी खरेदी केली जात आहे. आदिवासी उपयोजना अंतर्गत येणाऱ्या ११२ गावांमधील शेतकऱ्यांचा माल मंदाणे येथील आदिवासी उपयोजनेच्या एकाधिकार खरेदी केंद्रात व बिगर आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा माल शहादा येथील खरेदी विक्री संघात जिल्हा पुरवठा विभागाकडून खरेदी करण्यात येत आहे.

*खरेदी केंद्रावर नोंदणी आवश्यक*

शासनाच्या परिपत्रकानुसार मका पिकासाठी १७६० रुपये शासनाने हमी भाव दिला आहे तर ज्वारीसाठी २५०० रुपये हमीभाव देण्यात आला आहे. यासाठी मात्र मालाची आद्रता(मॉइश्चर)१४ चा असणे आवश्यक असून बाजरीसाठी एकरी १८ क्विंटल व ज्वारीसाठी एकरी ९ क्विंटलची खरेदी करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी आपली नांवे प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर येऊन नोंदणी करणे आवश्यक असून येतांना तलाठीकडून ज्या धान्याची विक्री करायची आहे. त्याबाबतचा रब्बी हंगामातील पिकपेरा नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स,आधारकार्ड झेरॉक्स व धान्याचे सँपल सोबत आणणे गरजेचे आहे.
*मका, ज्वारी सोबत बाजरीची खरेदी करा*

यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने बंद पडलेल्या विहिरीना बऱ्यापैकी पाणी आले. खरीप हंगामात पिकांना पाण्याची जास्त आवश्यकता न भासल्याने शहादा तालुक्यात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. विहिरींची पाण्याची क्षमता पाहता शेतकऱ्यांनी गहू, मका सोबत बाजरीची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मंदाणेसह परिसरात तर बाजरीचे यावर्षी सर्वात जास्त प्रमाणात उत्पन्न घेण्यात आले. सद्यस्थितीत शहादा तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये शेतकऱ्यांनी बाजरीचे उत्पन्न घेतले आहे. शेतकऱ्यांच्या घरात बाजरी येऊन ठेपली असून बाजारात विक्रीसाठी लॉकडाऊनमुळे घेऊन जाता येत नसल्याने बाजरी उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने भरड धान्य खरेदी सुरू केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु “नकटीच्या लग्नात सतरा विघ्न” या उक्तीनुसार शासनाने भरड धान्य खरेदी तर सुरू केली. मात्र, त्यातही बाजरीची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाच्या दुटप्पीपणामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आसमानी संकटात सापडला आहे.शासनाच्या परिपत्रकात भरड धान्य खरेदीत मका,ज्वारी, बाजरी, साय अश्या धान्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. परंतु तरी खरेदी केंद्रांवरील प्रतवारीकार, सहाय्यक कर्मचारी वर्गाला वरिष्ठ विभागाकडून फक्त मका,ज्वारीचीच सध्या खरेदी करावी बाजरीची खरेदी करू नये, असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये समज-गैरसमज निर्माण होत आहेत. या अतिगंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि भरड धान्यात बाजरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

“भरड धान्य खरेदीत मका,ज्वारी बरोबरच बाजरीची खरेदी करावी, याबाबत बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतकरी बाजरी खरेदीची मागणी करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे तसेच पुरवठा व पणन विभागाकडे कळविली आहे. बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी रास्त असून लवकरच त्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाईल.”
-श्रीमती गाडे
(विभागीय उपप्रादेशिक अधिकारी)