मंदाना येथे खळवाडीस आग

0

शहादा । तालुक्यातील मंदाना येथे आज दुपारी तांडा वसाहतीत लागलेल्या आगीत एक बैल होरपळून आगीच्या भक्षस्थानी पडला असून दोन गायी व एक वासरू जखमी झाले आहे. या आगीत शेतीपयोगी साहित्य, चारा,धान्य व घर बांधकामाचे साहित्यही जळाले आहे. यात सुमारे दोन अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी खेतीया व शहादा येथील अग्निशमन बंब मागविण्यात आले होते.या प्रकरणी शहादा पोलिसात अग्निउपद्रवचा गुन्हा दाखल झाला आहे.

वार्‍यामुळे आगीने घेतले रुद्ररुप
तालुक्यातील मंदाना येथे बसस्थानक मागे तांडा वसाहत आहे. या वसाहतीत बंजारा, आदिवासी व अन्य समाजातील लोकांची संमिश्र वस्ती आहे. या वसाहतीत आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मकराम सोमा राठोड यांच्या घरामागे खळवाडीस अचानक आग लागली. कडक ऊन व वार्‍यामुळे आगीने रुद्ररूप धारण केल्याने पळापळ झाली. ही वार्ता गावात पोहचताच सर्व समाजातील ग्रामस्थनी एकजूट होत स्वतःच्या घरातील पाण्याचा उपयोग करीत आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

दोन गाय, वासरु वाचविण्यात यश
दरम्यान, खेतीया येथील एक व शहादा येथील दोन अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. याघटनेत मकराम राठोड यांचा एक बैल आगीच्या भक्षस्थानी पडला तर संतोष श्रावण राठोड यांच्या दोन गायी व एक वासरू वाचविण्यात यश आले, मात्र तेही आगीने भाजले गेल्याने जखमी झाले आहेत. मकराम राठोड यांची खळवाडी व शेतीपयोगी साहित्य ही जळून खाक झाले आहे.

बांधकाम साहित्य खाक
लखा रामसिंग वंजारी यांचा गुरांसाठी असलेला चारा, सचिन भिला भिल व रामदास गोरख भिल यांचे घर बांधकामाचे साहित्यही जळून खाक झाले आहे आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आगीत सुमारे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी, महसूल विभागाच्यावतीने तलाठी धनगर व पोलीस दाखल झाले होते.