मंदिराच्या अनधिकृत सभामंडळाच्या कामाची चौकशी करा ः दत्ता साने

0

पिंपरी चिंचवड: पिंपळे गुरव येथील महादेव मंदिराचे जीर्णोव्दाराचे काम सुरु असताना दगडी सभामंडप कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सात ते आठ मजुर जखमी आहेत. सदरची घटना दुर्दैवी असून या मंदिराचे काम अनधिकृत बांधकाम चालू होते. पालिकेने अनधिकृत बाँधकाम थांबवून ते 24 तासात काढून घेण्याची नोटीस 16 नोव्हेंबर 2018 ला दिली होती. नोटीस बजावून बांधकाम चालू होते, त्यामुळे पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र या विभागाने काहीह कारवाई केली नाही. त्यांच्यावर राजकीय दबाब होता काय? असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

सदरचे काम हे स्मशानभूमीच्या शेजारी चालू होते. परंतु त्या शेजारी सुरु असणारे अनधिकृत मंदिराचे बांधकाम अतिक्रमण विभागाच्या निदर्शनास आले नाही का? तसेच नोव्हेंबर 2018 ला फक्त नोटीस देऊन मनपाचे अधिकारी गप्प का बसले? इतर ठिकाणी गोरगरीबाचे पत्राचे शेड जरी असले तरी नोटीस देऊन 24 तासांच्या आत अतिक्रमण कारवाई केली जाते. या मंदिराच्याबाबतीत तीन महिन्याचा कालावधी उलटूनही अतिक्रमण कारवाई का करण्यात आली नाही ? याचा खुलासा देण्यात यावा तसेच या दुर्घटनेत 4 निष्पाप जीव गेले आहेत. सात आठ मजुर गंभीर जखमी आहेत. याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी आहेत. त्यामुळे स्वत: जबाबदारी स्वीकारुन या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे.