नगराध्यक्षांच्या नातेवाईकांचा प्रताप: मुख्यमंत्र्यांची लेखी उत्तरात माहिती
मुंबई – देशात एकीकडे मंदिरे उभारण्यासाठी भाजप सरकार अट्टाहास धरत असताना याच भाजप सरकारच्या काळात मंदिराच्या जागेवर मदिरालय उभारल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टला धार्मिक कार्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडावर नगराध्यक्षांच्या आप्तेष्टांनीच परमिटरूम थाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इनाम म्हणून मिळालेल्या जमिनीवर मंदिराऐवजी उंच इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये लेखी उत्तरात दिले आहे.
शेवगाव तालुक्यातील या प्रश्नावर चक्क नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. शेवगाव-नेवासा रस्त्यावर श्रीराम देवस्थानच्या देखभालीसाठी ट्रस्टला ३१ एकराहून अधिक भूखंड देण्यात आला. परंतू विश्वस्तांनी या जमिनीतून उत्पन्न घेण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून ट्रस्टच्या भूखंडावर दोन्ही बाजूस उंच उमारती उभ्या केल्या तसेच परमिटरूमही बांधले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी सीमा हिरे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की फेब्रुवारी २०१८ मध्ये या ठिकाणी परमिटरूम व इतर बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या कलम ३७नुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच अहमदनगर कार्यालयातील निरीक्षकांमार्फत चौकशी सुरू असून ती अद्याप प्रलंबित आहे. चौकशीमध्ये विसंगती व तत्थ्य आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार. शेवगाव-नेवासा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बिअर बार व परमिटरूम उघडण्यात आले असून यासाठी कुठलेही नियम पाळले गेले नाही. काही राजकीय नेते आपले वजन वापरून नियमबाह्य काम करत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.