मंदिरे उघडी करा, अन्यथा…; भाजपचे सरकारला १ नोव्हेंबरचे अल्टीमेटम

0

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे बंद आहेत. आता दारूची दुकाने सुरु झाले आहेत, मात्र मंदिरे बंदच आहे. दरम्यान भाजपकडून मंदिरे सुरु करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण राज्यभर भाजपचे आंदोलन झाले होते. दरम्यान भाजपने पुन्हा राज्य सरकारकडे मंदिरे सुरु करण्याची मागणी केली आहे. १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे सुरु केली नाही तर मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सरकारला दिला आहे.

राज्यातील मंदिरं गेल्या ७ महिन्यांपासून बंद आहेत. इतर सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या असताना मंदिरं मात्र बंद ठेवली गेली आहेत. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी याआधी आम्ही राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. मात्र ठाकरे सरकारनं त्याची दखल घेतली नाही. आता सरकारनं १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंदिरांची टाळी फोडू, अशी भूमिका भोसलेंनी मांडली.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ दिली गेली नाही. त्यानंतर अध्यात्मित आघाडीनं सरकारला दसऱ्यापर्यंतची मुदत दिली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आघाडीकडून देण्यात आला. मात्र ठाकरे सरकारनं मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.