मंदिरे बंद : भाविकांनी बाहेरून घेतले दर्शन

हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोशल डिस्टन्सचे पालन करीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक व पूजाविधी

भुसावळ : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र शासनाने मंदिरे बंदचे आदेश दिले असलेतरी महाबलीवर अगाध श्रद्धा असलेल्या भाविकांनी मंदिराबाहेरच हनुमानाचे दर्शन घेत बुधवारी आशीर्वाद घेतला. नवसाला पावणार्‍या शिरसाळा मारोती येथेदेखील मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली असलीतरी सोशल डिस्टन्सचे पालन करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त भुसावळसह विभागात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक व पूजाविधी करण्यात आला. विशेष म्हणजे सलग दुसर्‍या दिवशी कोरोनामुळे जन्मोत्सव साध्या पद्धत्तीने साजरा करण्यात आला.

शिरसाळा येथे भाविकांची गर्दी
बोदवड :
नवसाला पावणारा हनुमान अशी ख्याती असलेल्या शिरसाळा येथे बुधवारी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली. मंदिर बंद असलेतरी तोच उत्साह बाळगत बाहेरून दर्शत घेत कोरोनाचा नायनाट व जगात शांती नांदण्यासाठी भाविकांनी साकडे घातले. सर्व भाविकांना गेटच्या बाहेरुनच दर्शन घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. लॉकडाऊन असल्यामुळे मंदिर बंद असून भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष विश्‍वनाथ पाटील, मारूतीरायाचे निस्सीम भक्त मेघराज बाफना नाशिक; हरिभाऊ बोरसे, भागवत पाटील, रामदास दांडगे, बाबुराव पत्रे, पुजारी प्रल्हाद धनगर आदींसह इतरांनी भाविकांसाठी आज बाहेरून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली.

भुसावळात पूजा व अभिषेक
भुसावळ :
कोरोना संकटामुळे यंदा सलग दुसर्‍या वर्षीही श्री हनुमान जन्मोत्सव साध्या पध्दतीने साजरा झाला. शहरातील विविध मंदिरांमध्ये होणारे सर्व सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम यंदाही रद्द करण्यात आले होते. श्रीराम मंदिर वॉर्डातील बडा हनुमान मंदिरातील जन्मोत्सवाचे फेसबुक लाईव्ह, युट्यूब, गुगल मिटव्दारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शहरातील शेकडो भाविकांनी घरी बसून जन्मोत्सवात सहभाग नोंदवला. मंगळवारी पहाटे योगेश अग्रवाल यांच्याहस्ते पंडित जयप्रकाश शुक्ला व महंत प्रशांत रामदासजी वैष्णव यांच्या उपस्थितीत महाभिषेक झाला. हनुमंताला मुंबई येथील भाविक के.जी.पाटील व शोभा पाटील यानी महावस्त्र अर्पण केले.यानंतर जन्मसोहळा, महाआरती करण्यात आली. उत्सव यशस्वीतेसाठी श्री बड़ा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत वैष्णव, भारती वैष्णव, अ‍ॅड.मेघा वैष्णव , विमल वैष्णव, संतोष टाक, गोविंद अग्रवाल, सामाजीक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा यांनी परीश्रम घेतले. स्टेशनरोडवरील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील जागृत हनुमान मंदिरात सकाळी धार्मिक विधी व जन्मोत्सव झाला. यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दिवसभर भाविकांना मंदिराच्या बाहेरुन दर्शन घेतले. यावल रोडवरील तापी काठावरील अंजाळे शिवारातील जागृत हनुमान मंदिरात पहाटे जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मुख्य बाजारातील जागृत काळा हनुमान मंदिरात दरवर्षी होणारे धार्मिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले. भाविकांनी मंदिराच्या बाहेरुच दर्शन घेतले.