मंदिर, व्यायाम शाळा, झाडाखाली शिक्षण घेताहेत विद्यार्थी

0

चिंबळी : खेड तालुक्यातील मरकळ केंद्रातील केळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीपर्यंत 152 विद्यार्थी शिक्षण घेत असून, मुलांना बसण्यासाठी वर्ग खोल्या अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे काही वर्गातील विद्यार्थ्यांना विठ्ठल-रूख्मिणी मंदिर व व्यायाम शाळेत तसेच झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत. मात्र, प्रशासनाला जाग येत नसून, केळगाव ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

केळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी 2016-17 मध्ये एसएससी अंतर्गत दोन वर्गखोल्या मंजूर झाल्या असून, डिसेंबर 2016 रोजी या खोल्यांचे बांधकाम सुरू केले. त्यासाठी शासनातर्फे 50 टक्के निधी शाळेत जमा करण्यात आला. त्यानिधीतून कामकाज सुरू केले, पंरतु गेले एक वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी शासनाचा 50 टक्के निधी अद्यापही शाळेकडे जमा होत नसल्याने या वर्ग खोल्याचे काम पूर्ण होत असल्याचे चित्र आहे. तसेच जि. प. अंतर्गत शाळा दुरूस्ती अतंर्गत निधी मंजूर झाला असून, त्यानिधींतर्गत ग्रामस्थ व बांधकाम ठेकेदार यांच्या मार्फत नवीन खोल्याचे बांधकाम सुरू केले. त्याचाही निधी जि. प. व पंचायत समितीमार्फत अद्याप जमा झाला नाही. त्यामुळेही दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना वर्ग खोल्याचे काम मात्र पूर्ण होत असल्याचे चित्र आहे.

अनेक प्रश्‍न होताहेत उपस्थित
विद्यार्थ्यांना बसण्यास वर्ग खोल्या नसल्याने कधी मंदिरात, तर कधी व्यायाम शाळेत व झाडाखाली बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शासनाला कधी जाग येणार? तसेच उर्वरीत निधी जमा होईल का? व केळगावच्या शाळेची इमारत उभी राहील का? असे अनेक प्रश्‍न सरपंच सोनाली मुंगसे, उपसरपंच मनोज मुंगसे व सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच शाळा समितीचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. दरम्यान, शासनाने तात्काळ निधी जमा न केल्यास शाळा बंद करून पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा शाळा समितीचे अध्यक्ष संदीप गुंड, उपाध्यक्षा शिल्पा भाडंवलकर आदींनी दिला आहे.