धुळे । मुंबई येथील श्री सिध्दीविनायक मंदीर येथे सुरक्षेच्या कारणास्तव श्रीफळ नेण्यात बंदी घालण्यात आली असून ही बंदी तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हा अधिकारी तुकाराम हुलवळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेे की, देव-देवतांना श्रीफळ वाहणे हा एक धार्मिक विधी असून भाविकांच्या श्रध्देशी तो निगडीत आहे. सुरक्षेचा बागूलबुवा निर्माण करुन मंदीरात श्रीफळ नेण्यास बंदी घालणे म्हणजे हिंदूना धार्मिक विधीपासून वंचित ठेवण्यासारखे असे म्हटले आहे.
बळजबरीने धर्मांतरण होत असल्याचा आरोप
या निवेदनात विदेशी पैशांच्या जोरावर धर्मांतराचे कार्य करणार्या स्वंयसेवी संस्था बळजबरीने हिंदूंचे धर्मांतरण करीत आहेत. आंतरजातीय विवाहाचे समर्थन करुन प्रोत्साहन दिले जात आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि धर्मांतर बंदी कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हा पंतप्रधानांशी अवमानकारक वक्तव्य करणार्या साजीद रशीद हिंदूंचे श्रध्दास्थान असणार्या प्रभु श्रीराम आणि माता सिता यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्या मौलाना देहलवी यांच्यावर कलम 295 अ नुसार कारवाई करावी ही देखील मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतांना हिंदू जनजागरण समितीचे पंकज बागुल, विलास राजपूत, अॅड.योगेश पाटील, मनोज घोडके, चेतन जगताप, भगवान चव्हाण, संदीप माळी आदी उपस्थित होते.