चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्याने व कापुस वेचणीच्या वेळी परतीचा पाऊस आल्याने कापूस उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली असुन भारतीय कपास निगमच्या वतीने 4320 हमी भावाप्रमाणे दर्जेदार कापूस खरेदी केला जात आहे. मात्र पावसाने थोडी फार कपाशी खराब झाली असुन त्यात शेतकर्यांचा दोष नाही म्हणून सरसकट कपाशी त्याच भावाने खरेदी करावी, तसेच मका खरेदीत कृउबा समितीत व्यापारी ओला मका असल्याचे भासवुन 1425 हमीभाव असताना 1000 ते 1100 रुपयाने भावाने खरेदी करत आहेत. मक्याची गुणवत्ता यंत्राद्वारे तपासणी करुन शासन हमीभाव प्रमाणे खरेदी करावा असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2017 रोजी निवेदनाद्वारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चाळीसगाव यांना आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
हमी भावपेक्षा 300 रूपयांनी कमी दर
चालू वर्षी चाळीसगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने काही शेतकर्यांना प्रमाणापेक्षा कमी असे कपाशी व मक्याचे उत्पन्न झाले असून त्यात परतीचा पाउस पडल्याने नुकसान होवुन कमी आलेल्या उत्पन्नात देखील घट येऊन कापूस वेचनीच्या मजुरीत शेतकर्यांचे कंबरडेच मोडले आहे. हाता तोंडाशी आलेल्या उत्पन्नावेळी परतीचा पाऊस पडल्याने कपाशीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होऊन नुकसान झाले आहे.
शासनाने कपाशीला व मक्याला नुकताच हमी भाव जाहीर केला त्यात कपाशीला 4320 रुपये तर मक्याला 1425 रुपये असा भाव जाहीर करून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे असतांना चाळीसगाव कृषीउत्पन्न बाजार समितीत मका ओला असल्याचे कारण पुढे करून व्यापारी शेतकर्यांना जवळपास प्रती क्विंटल मागे 300 रुपये कमी भाव देत आहे. खरे पाहता शासन नियमानुसार 14 टक्के पेक्षा कमी ओला मका हा शासनदराने खरेदी करावा, असे आदेश असतांना बाजारात आलेल्या मक्याची गुणवत्ता अथवा ओला, कोरडा अशी तपासणी न करता सरसकट भावाने मका खरेदी करून शेतकर्यांचे नुकसान केले जात आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपूत, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शहराध्यक्ष दत्ता पवार, शहरउपाध्यक्ष प्रदीप मराठे, समन्वयक पी.एन.पाटील, तालुकाउपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, समाधान मांडोळे, भरत नवले, भाऊसाहेब सोमवंशी, अनिल पाटील, शिवाजी जगताप, भैय्या यादव, सचिन जाधव, सुहास पाटील, विजय दुबे, सुनिल निबाळकर, महादु पवार, जयदीप पवार, शरद पाटील, भाऊसाहेब पाटील, सोनु साळुंखे आदिच्या स्वाक्षर्या आहेत.
शासन स्तरावरून मका गुणवत्ता व आद्रता मोजणीचे यंत्र तत्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीला उपलब्ध करून द्यावेत, त्यामुळे मका ओला कि कोरडा हे सिद्ध होऊन त्याचा भाव ठरला जाईल व शेतकर्यांचे हे नुकसान होणार नाही तसेच कपाशी पिकाचे देखील तीच परिस्थिती असून भारतीय कपास निगम लिमिटेड मार्फत चाळीसगाव व तळेगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु आहेत. मात्र या केंद्रावर फक्त कोरडा व दर्जेदार कापूस खरेदी होत असल्याने पावसात नुकसान झालेली कपाशी शेतकरी केंद्रावर आणत असतांना ती खरेदी केली जात नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकर्यांना कपाशी खाजगी व्यापर्यांना नाईलाजाने विक्री करावी लागत असून खाजगी व्यापारी मात्र 2500 ते 3000 रुपये दराने खरेदी करत आहेत. त्यातही कपाशी तोलाई मध्ये शेतकर्यांची वजनात लुट होत आहे. शासनाने हमी भाव जाहीर केलेला असतांना केवळ परतीचा पावसाने थोडीफार खराब झालेली कपाशी या केंद्रांवर खरेदी केली जात नाही म्हणून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकर्यांकडून सरसकट कपाशी शासनाने हमी भावाने खरेदी करावी व शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला असुन होणार्या परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा देण्यात आला आहे.