मक्तेदाराची बाजू घेणार्‍या उपायुक्तांची कानउघाडणी

0

कर्मचार्‍यांना बोलावून वॉटरग्रेसचा प्रतिनिधीच गायब : भाजप नगरसेवकांकडून उपायुक्तांची तक्रार

जळगाव: वॉटरग्रेसकडून शहराची स्वच्छता होत नसल्याने तीन दिवसांपूर्वी महापौर भारती सोनवणे यांनी प्रशासनसह शहर स्वच्छतेसाठी पर्यायी यंत्रणा उभी केली होती. आपल्याला पर्याय निर्माण झाल्याचे पाहताच बिथरलेल्या वॉटरग्रेसचे मुजोरी अधिकच वाढली. मंगळवारी पुन्हा सर्व कर्मचार्‍यांना कामावर बोलावून वॉटरग्रेसचा प्रतिनिधी स्वतःच गायब झाला. महापौर भारती सोनवणे यांनी टी.बी.सनेटोरियमला पहाटे अचानक दिलेल्या भेटीत हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लागलीच शहर स्वच्छतेसाठी पुन्हा सर्व वाहनांना रवाना केले. दरम्यान, यावेळी वॉटरग्रेसची बाजू घेणार्‍या मनपा अधिकार्‍यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली.

शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनाचा ठेका दिलेल्या वॉटरग्रेसकडून नियमीत साफसफाई केली जात नव्हती. इतकंच नव्हे तर मनपा प्रशासन त्याला पर्यायी यंत्रणा उभी करत असताना त्यात देखील वॉटरग्रेसकडून खोडा घालण्यात येत होता. महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तीन दिवसापूर्वी त्याठिकाणी जाऊन शहर स्वच्छतेसाठी घंटागाडीसह इतर वाहने लागलीच सुरू केली होती.

महापौरांचा शहर स्वच्छतेसाठी संताप

टी.बी.सनेटोरियमला महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, नितीन बरडे यांनी अचानक भेट दिली. वॉटरग्रेसने कर्मचार्‍यांना बोलाविले आणि त्यांचा प्रतिनिधीच नसल्याने सर्व वाहने थांबून असल्याची बाब समोर आली. महापौर भारती सोनवणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली असता रात्री वॉटरग्रेसकडून मेसेज आल्याने उपायुक्त यांनी तशा सूचना दिल्या असल्याचे समजले. शहरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना देखील मनपा अधिकारी वॉटरग्रेसला सूट देत असल्याने महापौर चांगल्याच सांतापल्या.

तीन दिवसात स्वच्छतेचे नियोजन करण्याचे आयुक्तांचे आदेश

मक्तेदाराने कामबंद केल्यामुळे शहरात सर्वत्र कचरा दिसून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कोरोना आणि साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण शहरातील साफसफाईते नियोजन तीन दिवसात करण्याचे आदेश आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांना दिले आहे. स्वच्छतेसाठी लागेल तेवढे मनुष्यबळ आणि वाहन देखील उपलब्ध करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

मनपा अधिकार्‍यांना खडसावले

महापौर भारती सोनवणे यांनी सर्व वाहन चालकांना तात्काळ वाहने घेऊन कचरा संकलनासाठी रवाना होण्याच्या सूचना केल्या. परंतु उपायुक्त दंडवते आणि आरोग्याधिकारी पवन पाटील यांनी वॉटरग्रेसच्या प्रतिनिधीला संपर्क करीत त्याची प्रतीक्षा करण्याचे सुचविले. जळगावकर जनता अस्वच्छतेमुळे अगोदरच बेजार झालेली असताना गलथान कारभार करणार्‍या वॉटरग्रेस प्रतिनिधीवर विश्वास दाखविणे कितपत योग्य असा सवाल महापौर भारती सोनवणे यांनी केला. तसेच वॉटरग्रेसची बाजू न घेता जळगावकर जनतेचे हित पाहण्याचा सल्ला देखील त्यांनी मनपा अधिकार्‍यांना दिला.

उपायुक्त दंडवते यांची मक्तेदारासोबत मिलीभगत

वॉटरग्रेस कंपनीचा मक्ता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेविकांनी आयुक्त सतीष कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे उपस्थित होते. प्रशासन मक्तेदाराला पाठीशी घालत असून, उपायुक्त मिनीनाथ दंडवते व आरोग्य निरीक्षक बडगुर्जर यांची मक्तेदारासोबत मिलीभगत असल्याचा आरोप कैलास सोनवणे यांनी केला. उपायुक्तांनी सर्व आरोप फेटाळत यामध्य आपला समावेश नसल्याचे सांगितले. त्यावर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी उपायुक्त दंडवते यांना धारेवर धरत मक्तेदारावरील दंड का माफ केला ? असा प्रश्न उपस्थित केला.

वाहनचालकांची महापौरांनी काढली समजूत

मनपा अधिकारी वॉटरग्रेसची बाजू घेत असल्याचे पाहताच वाहनचालकांचा पारा वाढला. अगोदरचे वेतन न देणार्‍या वॉटरग्रेसवर विश्वास ठेवला तर पुढील पगाराची शाश्वती तुम्ही घेणार का असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला. कामगारांना फितवीत असलेल्या वॉटरग्रेसचा प्रतिनिधी समोर आला तर त्याला चांगलाच दणका देऊ असे त्यांनी सांगितले. वॉटरग्रेस पुन्हा वाहनांचा ताबा घेणार असेल तर थकीत वेतन मिळाल्याशिवाय काम करणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला होता. महापौर भारती सोनवणे यांनी त्यांची समजूत काढत वॉटरग्रेससाठी न काम करता मनपासाठी करा असे सांगितल्यावर सर्व कर्मचारी शहर स्वच्छतेसाठी रवाना झाले.

कर्मचार्‍यांना मेसेज पाठवून बोलाविले

मनपाची पर्यायी यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर आपले काही खरे नाही हे वॉटरग्रेसला समजले. शहर स्वच्छतेची पर्यायी यंत्रणा मोडून काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा वॉटरग्रेसकडून कर्मचार्‍यांना व्हॉटसअँपवर मेसेज पाठवून मंगळवारी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. पहाटे 5.30 पासून कर्मचारी येऊन थांबलेले असताना देखील सकाळी 7 वाजेपर्यंत वॉटरग्रेसचा एकही प्रतिनिधी टी.बी.सनेटोरियमला उपस्थित झालेला नव्हता.