मक्तेदाराला आठ दिवसाचा अल्टीमेटम, अन्यथा मक्ता रद्द !

0

साफसफाईवरुन आमदार राजूमामा भोळे भडकले

जळगाव- शहरातील साफसफाईसाठी वारंवार सूचना देवूनही तक्रारी प्राप्त होत आहे. आठ दिवसात साफसफाईबाबत सुधारणा न दिसल्यास मक्ता रद्दची कारवाई करु अशी तंबी देवून आमदार राजूमामा भोळे मक्तेदाराच्या प्रतिनिधींसह अधिकार्‍यांवर चांगलेच भडकले.
साफसफाईबाबत महापौर सीमा भोळे यांच्या उपस्थित आढावा घेण्यात आला.यावेळी आ.राजूमामा भोळे,आ.चंदूलाल पटेल,उपमहापौर अश्‍विन सोनवणे, सभापती जितेंद्र मराठे,उपायुक्त मिनीनाथ दंडवते,आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील,वॉटर ग्रेसचे व्यवस्थापक डॉ.चंद्रकांत भंगाळे यांच्यासह आरोग्य अधिक्षक,आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. साफसफाईचा कोट्यावधी रुपयांचा मक्ता दिला आहे.साफसफाईपोटी नागरिकांकडून दुप्पट कर आकारणी केली जात आहे.मात्र त्यातुलनेने साफसफाई होताना दिसून येत नाही.वारंवार सूचना देवूनही तक्रारी वाढल्या आहेत.

आरोग्य विभागाची जबाबदारी
साफसफाईची जबाबदारी मक्तेदार यांच्यासह मनपा अधिकार्‍यांची देखील आहे.अधिकारी जर दुर्लक्ष करीत असतील तर अधिकारी आणि मक्तेदार यांच्यात संगनमत आहे असा समज करुन आरोप करु.उपायुक्त सकाळी फेरफटका मारुन साफसफाईची पाहणी करतांना दिसतात.मात्र मनपाचे अधिकारी काहीच करत नाहीत असे म्हणत आ.राजूमामा भोळे यांनी धारेवर धरले.तसेच मक्तेदाराच्या प्रतिनिधींना आठ दिवसात सुधारणा न केल्यास नवव्या दिवशी मक्ता रद्द करण्याची कारवाई करु असा इशारा आ.राजूमामा भोळे यांनी दिला.

आता काय उत्तर देवू
साफसफाईचा मक्ता दिल्यामुळे शहरातील चांगली साफसफाई होईल अशी अपेक्षा होती.त्यामुळे ’कचरा दाखवा-बक्षिस मिळवा’असा दावा केला होता.आता काय उत्तर देवू अशा शब्दात साफसफाईबाबत आ.राजूमामा भोळे यांनी नाराजी व्यक्त केली.