आंबेगाव । सहा रुपये हमीभाव मिळत असल्याने शेतकरी मका उत्पादनाकडे वळू लागला आहे. मंचर, अवसरी येथील शेतकरी शाश्वत पिक म्हणून मक्याचे उत्पादन घेत आहेत. शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्नला चांगला हमी भाव देऊन व्यापारी खरेदी करत असल्याने आंबेगाव तालुक्यात बेबीकॉर्न आणि स्वीटकॉर्नचे पिक घेण्याकडे शेतकरी वळला आहे. तसेच व्यापारी शेतातच मका घेण्यासाठी येत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
लागवडीसाठी बी, खतांचा पुरवठा
ऊस आणि स्वीटकॉर्न मक्यालाच हमी भाव मिळत आहे. इतर तरकारी पिकांना बाजारभावाची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकर्यांना कधी उंच बाजारभाव तर कधी माती मोल बाजारभाव मिळत आहे. मका लागवडीसाठी अनेक कंपन्यांनी शेतकर्यांना बी, खते असे भांडवल देऊन हमी बाजारभावाने खरेदी केली जात आहेत. त्यामुळे स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न लागवडीकडे शेतकरी वळाल्याचे दिसून येते.
कमी भांडवलात चांगले पीक
अडीच ते तीन महिन्यांत स्वीटकॉर्न उत्पादीत होते. तसेच स्वीटकॉर्नचे किंवा बेबीकॉर्नचे कणीस काढल्यानंतर राहिलेल्या ताटाचा जनावरांना चारा म्हणून वापर केला जात आहे. सध्या 6 रूपये किलोने हमी बाजारभाव देऊन शेतकरी स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न खरेदी करत आहे. कमी भांडवल तसेच कमी कष्टात पिक येते. त्यामुळे शेतकरी पुन्हा या पिकाकडे वळाल्याचे दिसून येते.