मगरीप्रमाणे आयुक्तांचीही चोरी होती की काय? नगरसेवकांना भीती

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या संत बहिणाबाई चौधरी उद्यानात सुरक्षारक्षक असताना मगरी, अजगरांची चोरी होतीच कशी?, एवढे मोठे अजगर चोरीला जातेच कसे, अजगराची चोरी होत असताना सुरक्षारक्षक काय करत होते. त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्या चौकशांचे पुढे काय झाले. दोषींवर कारवाई केली का? असे विविध सवाल नगरसेवकांनी महासभेत उपस्थित केले. तसेच मगरीप्रमाणे आयुक्तांचीही चोरी होते की काय? अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. तसेच आयुक्तसाहेब तुम्हाला शोभेचे बाहुले म्हणून बसविले नाही. दबावाखाली किती काम करायचे, याचे आत्मपरिक्षण करा, असा सल्लाही नगरसेवकांनी आयुक्तांना दिला.

मंगला कदम, दत्ता साने यांच्या फैरी
महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा मंगळवारी पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. विषयपत्रिकेवर नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळील उद्यान विभागाच्या जागेवर संगोपन केंद्र उभारण्याचा विषय होता. त्या विषयावर चर्चा करताना नगरसेवकांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. मंगला कदम म्हणाल्या, उद्यानातून एवढे मोठे अजगर चोरीला जातातच कसे? त्यावर कारवाई का केली नाही. ज्यांच्यावर संशय आहे. त्यांना निलंबित का केले नाही? उद्यानाबाबत ’षडयंत्र’ सुरु आहे. दत्ता साने म्हणाले. सहा महिन्यापासून प्रशासन झोपले आहे. उद्यानात सुरक्षारक्षक असताना अजगर, मगरींची चोरी होतेच कशी?, सुरक्षारक्षक काय करत होते. पालिकेच्या वस्तूची चोरी झाल्यावर त्याला जबाबदार कोण? तसेच मगरी प्रमाणे आयुक्तांचीही चोरी होती की काय? असा प्रश्‍न पडला आहे. मगर, अजगर चोरी प्रकरणाचे काय झाले. त्याचा खुलासा करण्याची मागणी साने यांनी केली. तसेच चोरीवेळी जो कर्मचारी उद्यानात हजर नव्हता. त्यालाच निलंबित केले आहे. चोर सोडून सन्यासाला शिक्षा दिली जाते, हे चुकीचे आहे. सचिन चिखले म्हणाले, मगर, अजगर चोरीचे काय झाले. त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. समितीने काय चौकशी केली. समितीच्या अहवालाचे काय झाले.