लाहोरच्या बाघबनपुरा भागात 7 जून 1935 रोजी जन्मलेली खुर्शीद अख्तर, पेशाने फळविक्रेत्या असलेल्या आपल्या बापाचे बोट धरून वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी, 1945 साली मुंबईला येते काय आणि बघता बघता लाखो चित्रपट रसिकांच्या मनात आपले कायमचे स्थान निर्माण करते काय, सगळेच अजब म्हणायला हवे! श्यामा या नावानेच सर्वांना सुपरिचित असलेली ही गुणी आणि देखणी अभिनेत्री परवाच मुंबईत निधन पावली. शकीला, श्यामा आणि शशिकला या समकालीन अभिनेत्री! शकीला अलीकडेच अल्लाला प्यारी झाली. आता श्यामा इहलोकातून निघून गेली.
पुढील काळात नूरजहांशी निकाह केलेले शौकत हुसैन रिझवी हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. ते दोघेही 1947 साली फाळणी होताच पाकिस्तानला निघून गेल्याने या बाल अभिनेत्रीचे भवितव्य काय, असा प्रश्न तिच्या वडिलांना पडला असतानाच, दक्षिण भारतीय भाषेतल्या मीराबाई या त्याकाळी गाजत असलेल्या चित्रपटाच्या हिंदी संस्करणात तिला छोट्या मीराची भूमिका करण्याची संधी मिळाली. भविष्यात भारतरत्न प्राप्त झालेल्या एम.एस. सुब्बलक्ष्मी यांनीच मूळ चित्रपटात मीराची भूमिका केली असल्याने या हिंदी चित्रपटाचाही बर्यापैकी बोलबाला झाला आणि श्यामसुंदर श्रीकृष्णावर प्रेम करणार्या बालपणीच्या मीरेची भूमिका उत्तम वठवणारी खुर्शीद अख्तर श्यामा या नव्या नावाने रसिकांसमोर पेश झाली. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी हे नाव तिला दिले असल्याचे बोलले जाते. शबनम, पतंगा, हम लोग, तराना, अशा चित्रपटात तिने लहानसहान भूमिका केल्या.
मात्र, 1954 साली प्रदर्शित झालेल्या आरपार या चित्रपटाने तिला प्रसिद्धीच्या झोतात आणले. गुरुदत्त यांच्यासारख्या मातब्बर निर्माता-दिग्दर्शक-अभिनेत्यांसोबत नायिकेच्या भूमिकेत काम केले. आरपार चित्रपटातली सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आणि शमशाद बेगमने म्हटलेल्या, कभी आर कभी पार, लागा तीर- ए-नजर. या गाण्यासोबतची श्यामाची अदाकारी रसिकांना फारच भावली. ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर आँखों में छा गया है, या गाण्याने गायिका गीता दत्तप्रमाणेच श्यामाने रसिकांची मने जिंकली. अल्लाड आणि अवखळ भूमिकांप्रमाणेच अत्यंत शालीन स्त्री म्हणून ती भाभी या चित्रपटात चमकली. का रे का रे बादरा, जा रे जा रे बादरा, हे तिच्यावर चित्रीत झालेले गाणे कित्येक वर्षे घराघरांत गुणगुणले जात असे. बरसात की रात या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेने लोकप्रियतेचे जणू शिखर गाठले. मुझे मिल गया बहाना…दिल की खुशी लेके गया चाँद, ईद का… हे तिच्यावर चित्रीत झालेले गाणे आजही कुठे ऐकू आले की मन कसे मोहरून जाते! अगदी दिलखेचक नृत्य करणार्या अथवा कव्वाली सादर करणार्या गायिकेपर्यंतच्या कोणत्याही भूमिकेत तिने जीव ओतून काम केले. बरसात की रात में मध्ये सवाल -जबाबप्रसंगी, आशाच्या आवाजात ती जेव्हा म्हणते, मेरे नामुराद जुनून का है इलाज कोई तो मौत है…. जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर की तलाश है तेव्हा प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असे. दो बहने या चित्रपटात तिने एकटीनेच दोन जुळ्या बहिणींच्या भूमिका साकारल्या. जाल मिस्त्री या पारशी धर्माच्या विख्यात सिनेमाछायाचित्रकार बरोबर तिचा प्रेमविवाह झाला होता. 1957 सालच्या शर्त या चित्रपटातले एक युगुल गीत आज मला विशेष करून आठवतेय ज्यात हेमंत कुमारने कुणा दीपक नावाच्या नायकाला तर गीता दत्तने श्यामासाठी ते गायले होते. शब्द होते, न ये चाँद होगा, न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. श्यामाच्या निधनानंतरही तिच्या हजारो चाहत्यांना तिच्याबद्दल हेच म्हणावेसे वाटत असेल!
– प्रवीण कारखानीस
9860649127