मग्न तळ्याकाठी, उत्तम नाट्यकृती

0

जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित, निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि महेश एलकुंचवार लिखित वाडा चिरेबंदी ह्या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. त्याच्याच पुढचा भाग म्हणजे मग्न तळ्याकाठी हा आहे. वाडा चिरेबंदी मध्ये देशपांडे कुटुंबाची कथा असून त्यांचा गोतावळा खूप मोठा आहे, दोन भाऊ, वहिनी, बहिण, नातवंड इत्यादींचा मोठा परिवार ह्या वाड्यातील कुटुंब प्रमुख तात्यांजींच्या निधना नंतर हे कुटुंब एकत्र आलेले आहे, भास्कर त्यांची पत्नी वहिनी, मुलगी रंजू, मुलगा पराग, आई, चंदू, आणि त्यांची मानसिक आजाराने त्रस्त असलेली बहिण प्रभा असे सारे वाड्यात रहात असतात, त्यावेळी भास्करचा भाऊ सुधीर त्याची पत्नी अंजली, मुलगा अभय हे सारे मुंबईहून वाड्यात आलेले असतात, वाड्यात पराग आणि त्याची पत्नी नंदिनी असे सारे जमलेले असतात, त्यापूर्वीच दोन भावांच्या मध्ये नाते फक्त बोलण्यापुरतेच राहिलेलं असते, सुधीर, अंजली, अभय हे मुंबईला नोकरी निमित्त रहात असतात, आता ते जरी स्थिरावलेले असले तरी त्यांच्या विषयी परागच्या मनांत अढी निर्माण झालेली असते, कारण त्याला सुधीर काकांनी शिकण्यासाठी मुंबईला नेलेलं नसते, त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण झालेला असतो, पराग हा मुलगा गुंड प्रवृतीचा असल्याने त्याच्या नादाने अभयच्या जीवनावर परिणाम होईल अशी भीती अंजलीला वाटत असते,

पराग गावातच रहात असतो, पहिल्यापासून तो तापत आणि मनाला येईल ते करणारा, त्याचे गावातल्या एका विधवा बाई बरोबर संबंध असतात, आणि त्याचे इतर गैरव्यवहार सुरूच असतात, लग्न झाल्यावर तो सुधारेल अशी अशा त्याच्या वडिलांना असते पण तसे होत नाही, त्याच घरातील रंजू ही पूर्वी एका मास्तरांच्या बरोबर पळून गेलेली असते त्याची चर्चा गावात असतेच, त्यामुळे तिचे आता लग्न होणे कठीण असते. ह्या वाड्यात राहणारे आणि वाड्यात मुंबईहून आलेला त्याचा भाऊ त्याचे पटत नाही, नाते संबंध तुटलेले असतात, अश्याच वातावरणात पराग आणि अभय काही कारणामुळे एकत्र येतात, आणि गावातल्या तळ्याकाठी रात्री गप्पा मारायला जातात, त्यांच्यात मैत्री होते. दोन कुटुंबाचे शेवटी काय होते ? त्यांच्यामध्ये असलेली भावनांची दरी संपून जाते का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मग्न तळ्याकाठी ह्या नाटकात मिळतील.

मग्न तळ्याकाठी हे नाटक अनेक व्यक्तिरेखांनी गुंफलेलं उत्कृष्ट नाटक आहे. भाव-भावनांचे धागेदोरे एकमेकात गुंतलेले आहेत. एक उत्तम कथानक नाटकात रंगवलेलं आहे, चंद्रकांत कुलकर्णी यांनी संपूर्ण नाटक बंदिस्तपणे बसवला आहे. यामध्ये वैभव मांगले, प्रसाद ओक, निवेदिता सराफ, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर, चिन्मय मांडलेकर, पूर्व पवार, प्रतिमा जोशी, भारती पाटील, दीपक कदम ह्या कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम साकारलेल्या आहेत, भूमिका मोठी असो किंवा लहान असो त्याला प्रत्येकानी न्याय दिलेला आहे, उत्तम टीमवर्क आहे. प्रदीप मुळ्ये यांनी उभारलेला वाडा खूप छान असून राहुल रानडे, आनंद मोडक यांचे संगीत, रवि रसिक यांची प्रकाश योजना, तसेच भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषेची जबाबदारी छान सांभाळलेली आहे,
एक संस्मरणीय नाट्यकृती म्हणून मग्न तळ्याकाठी बघता येईल.

-दीनानाथ घारपुरे
9930112997