मग मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडा

0

मुंबई – राज्यात सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकारचा निर्णय घिसडघाईने घेतलेला असून उद्या मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडणार काय, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला.

मंत्रालयासमोरील क – ४ या सरकारी बंगल्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या शिवसेनेच्या ‘शिवालय’ या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. कोणताही निर्णय घिसडघाईने घेऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिला. कोणताही निर्णय घेताना आधीच्या निर्णयाचा आढावा घ्यायला हवा. जर सरपंच किंवा नगराध्यक्ष वेगळ्या विचाराचा निवडून आला की त्या ठिकाणी मतभेद होतात. तेव्हा सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेमुळेच कर्जमाफी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उतरली. कर्जमाफीची मागणी लावून धरली. अखेर मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीची घोषणा करावी लागली. त्यामुळे शिवसेनेवर विधानभवनावर मोर्चा काढण्याची वेळ आली नाही. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होते हे महत्त्वाचे आहे. मी शिवसैनिकांना गावागावातील बँकांमध्ये जाऊन कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे, असे ठाकरे म्हणाले.

९ जुलैपासून शेतकऱ्यांशी संवाद
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील शेतकऱ्यांची नावे आहेत. हे जरी ऐकायला विचित्र असले तरी खातरजमा करायला काय हरकत आहे. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यापेक्षा ज्या ४० लाख शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला आणि ज्या ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला आहे याची यादी जाहीर करावी. येत्या ९ जुलैपासून आपण पुन्हा महाराष्ट्रभर दौरा करून किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते ठरवतील तो वाल्मिकी
राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची शक्यता असल्याबद्दल विचारले असता, ते ठरवतील तो वाल्या आणि ते ठरवतील तो वाल्मिकी आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

कायद्याचा बागुलबुवा नको
गणेशोत्सवाचा प्रश्न दरवर्षीप्रमाणे याहीवेळी ऐरणीवर आला आहे. दरवेळी कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूवरच बंधने आणणार असाल तर ते चालणार नाही. कायदे नंतर आले. गणेशोत्सव पूर्वीपासून आहे. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर शिवसेना हा उत्सव दणक्यात साजरा करणार, असे ते म्हणाले.