मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना बोंडअळीची मदत मिळाली नाही. कर्जमाफीचे नावही नाही. हक्काचे पीक कर्ज दहा टक्केही मिळाले नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पत्नीकडे अधिकारी शरीरसुखाची मागणी करत आहेत यामध्ये सरकारने कोणतीच भूमिका घेतली नाही मग असे असताना विदर्भात अधिवेशन घेण्याचे नाटक सरकार कशाला करते आहे अशा शब्दात राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर जोरदार हल्ला केला पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये विरोधी पक्षांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल करत अधिवेशनामध्ये सरकारला सळो की पळो करुन सोडणार असल्याची चुणूक दाखवून दिली.
धनंजय मुंडे यांनी या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पडणार असून सरकारकडून कृती काहीच होणार नसल्याचे स्पष्ट केले. पीक कर्जासाठी हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल गेली आहे. यावर मुख्यमंत्री मात्र गप्प बसले आहेत. नेहमी ट्वीटरवर टिव टिव करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना इशारा देणारं एकही ट्वीट केलेले नाही यावरुन सरकारची शेतकऱ्यांविषयीची मानसिकता दिसून येत आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. स्वर्गीय पांडुरंग फुंडकर यांनी कृषीमंत्री असताना जाहीर केलेली बोंडअळीची मदतही सरकार देवून त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करु शकत नाही. नागपूरला अधिवेशन घेण्याअगोदर शेतकरी हिताचे, नागपूर, विदर्भाचे प्रश्न सोडवले असते तर आम्ही त्यांचे अभिनंदन केले असते असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.
अनेक देशांनी नाकारलेल्या कंपनीला काम देत नाणार प्रकल्प करण्याची नौटंकी सरकार करत आहे. जनतेचा विरोध असेल तर आम्ही प्रकल्प होवू देणार नाही असा इशारा देतानाच धनंजय मुंडे यांनी प्लास्टिकबंदी म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप केला. या पत्रकार परिषदेमध्ये मुंडे यांनी तुर, हरभरा, मुग, सोयाबीनची खरेदी, मुंबई डीपीमधील भ्रष्टाचार म्हणजे बिल्डरों के हाथ, पक्षनिधी के साथ, सहकारमंत्री देशमुख यांच्यावरील गुन्हे, नागपूरची कायदा व सुव्यवस्था या सगळया प्रकरणात मुख्यमंत्री गृहखाते चालवण्यात अपयशी ठरले आहे असा आरोपही केला.