मच्छी मार्केट स्थलांतरास व्यापार्‍यांचा विरोध

0

इंदापूर । इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक वर्षांपासून असलेला तक्रारवाडी येथील मच्छीबाजार (मच्छी मार्केट) भिगवण येथे नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने येथील व्यापार्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यास मच्छी व्यापार्‍यांनी जोरदार विरोध दर्शविला असून स्थलांतरास हरकती घेणार असल्याचे मच्छी व्यापार्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बाजार कर न भरण्याचा निर्णय
जिल्ह्यात इतर तालुक्यात मच्छी बाजार स्वतंत्र आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यातील दोन मच्छी बाजार बाजार समितीकडे का आहेत, असा सवाल यावेळी व्यापार्‍यांनी यावेळी केला. बाजार समिती करापोटी लाखो रुपये घेत आहे. त्यामानाने कसल्याही सुविधा देत नाही, अशाही तक्रारी व्यापार्‍यांनी मांडल्या. सुविधा मिळत नसल्याने येथील काही मच्छी व्यापार्‍यांनी कर भरणे बंद केले आहे. तर काही व्यापार्‍यांनी बुधवारपासून बाजार कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजार नवीन वास्तूत हलविणार
30-35 वर्षांपासून तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या जागेत मच्छी मार्केट चालू असून, सध्या तीन वर्षांपूर्वी इंदापूर बाजार समितीने भव्य असे मार्केट उभारले आहे. मात्र, अद्याप त्या जागेत मच्छी मार्केट हलविण्यात आलेले नाही. नुकताच बाजार समितीच्या वतीने हा मच्छी बाजार भिगवणच्या नवीन वास्तूत हलविण्यात येणार असल्याचे व्यापार्‍यांना सांगण्यात आले. सध्या असलेल्या जागेवरच आपण व्यापार करणार असल्याचा ठराव करण्यात आला आहे. चारपेक्षा जास्त लिलाव काटे नकोत, बाहेरील गावातील व्यापार्‍यांना लिलाव बोलण्यास बंदी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.