मजूर अड्याच्या मागणीसाठी असंघटित कामगारांचा महापालिकेवर मोर्चा 

0
कामगारांसाठी मजूर अड्डा नसणे ही शोकांतिका : इरफान सय्यद
शिवसेना व महाराष्ट्र मजदूर संघटना उतरली रस्त्यावर 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक, कामगारनगरी अशी ओळख आहे. शहराचा नावलौकिक वाढविण्यात असंघटित, बाधकाम कामगांराचे मोठे योगदान आहे. आशिया खंडात श्रीमंत महापालिका असे  बिरुद असलेल्या महापालिका हद्दीत कामगारांसाठी मजूर अड्डा, मजूर नाका नाही, ही मोठी शोकांतिका आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर उन, वारा, पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर उभे राहतात. त्यांच्यासाठी पालिकेने त्वरित पत्राशेड टाकून शहराच्या विविध भागात मजूर अड्डा करावा, अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली. तसेच पोलिसांनी मजूर अड्यावर कारवाई करण्यापेक्षा शहरात राजरोसपणे चालणार्‍या जुगार, मटक्याच्या अड्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
कामगारांना मजुर अड्डा गरजेचा 
शहरातील कामगारांना हक्काचा मजूर अड्डा मिळावा या मागणीसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटना आणि शहर शिवसेनेच्यावतीने इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.12) पिंपरी महापालिकेवर मोर्चा काढला. शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरीचे आमदार अ‍ॅड.गौतम चाबुकस्वार, शहर संघटिका सुलभा उबाळे, उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, आबा लांडगे, समन्वयक रोमी संधू, दस्तगीर मनियार, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव पांडुरंग कदम, उज्वला गर्जे, खंडू गवली, मारुती कौदरे, प्रितेश शिंदे, महेश हुलावळे, श्रीकांत मोरे, मारुती वाळूंज, शंकर मदने, सुनील साळवे, राजू तापकीर यांच्यासह कामगार टिकाव, फावडे, घमेले घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
भोसरीतील मजुर अड्डा बंद
इरफान सय्यद म्हणाले की, शहराच्या नावलौकिकात कामगारांमुळेच भर पडली आहे. त्या कामगारांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असून त्यांना हक्काचा मजूर अड्डा देणे गरजेचे आहे. भोसरीतील नाक्यावर कामगार थांबत होते. परंतु, आत्ता त्यांना तिथे थांबून दिले जात नाही. पोलिसांकडून मारहाण केली जाते. शहरात हातभट्टी अड्डा, जुगार अड्डा, मटका अड्डा आहे तर कष्टकरीनगरीत मजुर अड्डा का नाही? त्यामुळे महापालिकेने मजुरांसाठी शहरात ठिक-ठिकाणी त्वरित पत्राशेड टाकून हक्काचा मजूर अड्डा द्यावा.
आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, भोसरी, काळेवाडी, पिंपरी, थेरगाव, थरमॅक्स चौकातील मजूर अड्डे उद्धवस्त करण्याचे काम सत्ताधारी आणि पालिका प्रशासन करत आहे. पालिकेने त्वरित मजुरांना हक्काचा अड्डा देण्यासाठी जागा उपलब्ध करुन त्या ठिकाणी पत्राशेड टाकून मजूर अड्डा करावा. पालिकेने ही मागणी पूर्ण  केली नाही. तर, त्यासाठी मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. कामगांरामुळेच पिंपरी-चिंचवड शहराचे महानगरात रुपांतर झाले. या नगरीने रिकाम्या हातांना काम दिले. या कामगारासांठी जागा नसल्याचे पालिकेकडून सांगितले जाते असे सांगत योगेश बाबर म्हणाले, कामगारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात असून कामगारनगरीची ओळख पुसण्याचे काम सुरु आहे. कष्टकर्‍यांवर अन्याय करणार्‍यांना शिवसेना आडवी पाडल्याशिवाय राहणार नाही. पालिकेने मजूर अड्यासाठी जागा आरक्षित करावी. जोपर्यंत कामगारांना हक्काची जागा मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना लढा देणार आहे.
कामगारांवर अन्याय
सुलभा उबाळे म्हणाल्या की, कामगारांची मजूर अड्याची मागणी पूर्ण करता येत नाही. यासारखा करंटे कोणी नाही. कामगारांवर अन्याय सुरु आहे. त्यांच्याकडून हप्ते घेतले जातात. पोलिसांनी मजूर अड्यावर कारवाई करण्यापेक्षा दारु अड्यावर कारवाई करावी. दरम्यान, शिष्टमंडळाने प्रभारी अतिरिक्तआयुक्त प्रवीण अष्टिकर यांची भेट घेतली. आयुक्तांनी मजूर अड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले. ‘ना कायम काम ना धंदा, हिसकावून घेतला आमचा मजूर अड्डा’, ‘रिक्षा स्टॅन्ड, बस स्टॅन्ड मग मजूर अड्डा का नाही?’, ‘अण्णाभाऊंनी केला मजुरांचा उद्धार, शासन करते त्यांना हाणामार’, ‘शहरात हातभट्टी अड्डा, जुगार अड्डा, मटका अड्डा मग मजूर अड्डा का नाही’ अशा मजकूराचे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. ‘कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवार राहणार नाही’, ‘कामगार नाका झालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘मजुरांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ अशा जोरदार घोषण देत कामगारांनी पालिका परिसर दणाणून सोडला होता.