मजूर पुरविणार्‍या ठेकेदारांना मुदतवाढ

0

17 लाखाचा होणार वाढीव खर्च

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पाणीपुरवठा वितरीत करण्यासाठी कृष्णानगर संप व पंप हाऊस आणि इतर ठिकठिकाणी व्हॉल्व प्रक्रिया तसेच उंच पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा वितरण व्यवस्था राबविण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने मजुर पुरविण्यात येतात. मात्र, या मजुरांच्या कामाची मुदत संपली असून जुने काम पुढे सुरू ठेवण्याची गरज असल्याने दोन्ही ठेकेदारांना मजूर पुरविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या दोन्ही वेगवेगळ्या कामांसाठी 17 लाख वाढीव खर्च येणार असून याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

दोन्ही कामांची मुदत संपली
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत कृष्णानगर संप व पंप हाऊस आणि इतर ठिकठिकाणी पाणीपुरवठा वितरीत करण्याकरिता व्हॉल्व चालू आणि बंद करण्याची प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी समीप सर्व्हिसेस या ठेकेदारामार्फत मजूर पुरविण्यात आले आहेत. निविदा दरापेक्षा 7.59 टक्के कमी दराने त्यांना काम देण्यात आले आहे. तर, ‘अ’ प्रभागांतर्गत उंच पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा वितरण व्यवस्था राबविण्यासाठी बापदेव महाराज स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्थेला निविदा दरापेक्षा 7.6 टक्के कमी दराने त्यांना काम देण्यात आले आहे. या दोन्ही कामाची मुदत संपली आहे. या कामांसाठी मजूर पुरविण्याकरिता निविदा काढण्यात आली आहे. मात्र, प्राप्त दर, बोनस, सेवाकर याबाबत विभिन्न मत असल्याने निविदा स्विकृती प्रक्रिया क्लिष्ठ झाली असल्याने विलंब होणार आहे.

पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवेचा भाग असल्याने पाणीपुरवठा व्हॉल्व चालू-बंद करण्यासाठी या कामाचे सुधारीत अंदाजपत्रक करून रकमेस आणि कामास मुदतवाढ घेण्यात येणार आहे. सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात नवीन मजूर पुरवठा करणे या कामासाठी अनुक्रमे 26 लाख रूपये आणि 34 लाख 50 हजार रूपये इतकी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. हा सुधारीत खर्च 16 लाख 78 हजार आणि 31 लाख 76 हजार रूपये होत आहे. त्यामुळे दोन्ही कामांसाठी 17 लाख 50 हजार रूपये वाढीव खर्च होणार आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.