मटण का खाऊ घालत नाही म्हणून संतप्त मुलाने पित्याला कुर्‍हाडीचे घाव घालून संपवले

माण : मटण का खाऊ घातले नाही ? म्हणत संतप्त मुलाने पित्याचा कुराडीने घाव घालून खून केला. माण तालुक्यातील कासारवाडीत ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत पांडुरंग बाबुराव सस्ते (70) या वृद्धाचा मृत्यू झाला तर आरोपी मुलगा नटराज पांडुरंग सस्ते यास अटक करण्यात आली.

किरकोळ कारणावरून वडिलांचा खून
आरोपी नटराज हा आपले वृध्द वडील पांडुरंग बाबुराव सस्ते यांच्यासह वास्तव्यास होता. वडिल मटण का खाऊ घालत नाही म्हणून मुलगा चिडला व शुक्रवारी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास कासारवाडी येथील स्वतःच्या मालकीच्या भंडारदरा मळवी या शिवारात पाठीमागून डोक्यावर व मानगुटीवर मुलगा नटराज यांने वडील पांडुरंग सस्ते यांच्यावर कुराडीने घाव घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत होऊन पडले.

दहिवड पोलिसात खुनाचा गुन्हा
ही घटना गावभर पसरताच सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर चतुराबाई पांडुरंग सस्ते (60) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दहिवडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. डी. तुपे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भादंवि 302 प्रमाणे मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपी नटराज सस्ते यास पोलिसांनी अटक केली.