मणिपूरमध्येही भाजपच

0

मणिपूर : भाजपने देशभरातील सर्वच राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. जिथे स्पष्ट बहुमत मिळाले नाही, अशा राज्यांमध्ये विश्‍वासदर्शक ठराव जिंकून सत्ता स्थापन केली आहे. गोव्यात सरकार स्थापन करतानाही भाजपला विश्‍वासदर्शक ठराव जिंकावा लागला होता. याच धर्तीवर आता भाजपने मणिपूरमध्येही आपला झेंडा रोवला आहे. या राज्यातही भाजपने बहुमताची चाचणी जिंकली आहे. या बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने 33 मते पडली असून, बहुमत सिद्ध करत मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह हे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेले पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. बिरेनसिंह हे राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉलपटू आहेत.

मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे एन. बिरेनसिंह यांची विधानसभेत बहुमत परीक्षा होती. 60 सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपला 21, तर काँग्रेसला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या होत्या. दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरूनही भाजपने छोट्या पक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. सोमवारी विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे आव्हान भाजपसमोर होते. अपेक्षेप्रमाणे भाजपने बहुमताचा आकडा सहज गाठला. सरकारच्या बाजूने 33 जणांनी मतदान केले आहे. भाजपने नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाच्या 4, नागा पीपल्स फ्रंट या पक्षाचे 4, लोकजनशक्ती पक्षाचे एक आणि दोन आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. अपेक्षेप्रमाणे भाजपने बहुमत ठराव जिंकला आहे. सोमवारी विधानसभेत वाय. हेमचंद सिंह यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

बहुमताच्या परीक्षेत दगा फटका होऊ नये यासाठी भाजपचे सर्व आमदार, भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदाराला गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये उतरवण्यात आले होते. गेल्या गुरुवारपासून हे सर्व जण गुवाहाटीत होते.

दरम्यान, एन. बिरेनसिंह यांच्या मंत्रिमंडळात दोन भाजप आमदारांचा समावेश आहे, तर नॅशनल पीपल्स पार्टीच्या चारही आमदारांना मंत्रिपद देण्यात आले होते. याशिवाय लोकजनशक्ती पक्ष आणि नागा पीपल्स फ्रंट या पक्षातील प्रत्येकी एका आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मित्रपक्षाच्या आमदारांना सांभाळून सरकार चालवण्याचे आव्हान मुख्यमंत्री बिरेनसिंह यांच्यासमोर असणार आहे. पाच वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता. पण यंदा पक्षाने 21 आमदारांसह थेट सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे मणिपूरमधील यश हे भाजपसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.