इंफाळ : पूर्वोत्तर राज्य असलेल्या मणिपूरमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार बनले आहे. एन. बिरेन सिंह यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एनपीपीचे नेते जॉय कुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. छोट्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन भाजपने सत्तेचे गणित जुळवले असून, काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात भाजपला यश आले आहे. सिंह हे एका स्थानिक दैनिकाचे संपादक असल्याने भाजपने एका पत्रकाराला संपादकपदी संधी दिली आहे. इतिहासात प्रथमच भाजपचा नेता मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला आहे.
सर्वात मोठा पक्ष काँग्रेस सत्तेपासून दूर
मणिपूरसह पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 11 मार्चरोजी लागला. 60 सदस्यांच्या या विधानसभेत काँग्रेसचे 28 तर भाजपचे 21 आमदार निवडून आले. बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला अवघ्या तीन आमदारांची गरज होती. मात्र, काँग्रेसने काही हालचाल करण्याआधीच भाजपने छोटे पक्ष व अपक्षांसह बहुमताचे गणित जुळवत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपच्या 21 आमदारांबरोबरच नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पक्षाचे प्रत्येकी 4, एलजेपी व तृणमूलचा प्रत्येकी एक आणि काँग्रेसच्याच एका आमदारासह एन. बिरेन यांनी एकूण 32 आमदारांची परेड राज्यपालांसमोर केली. बिरेन यांच्या या शक्तिप्रदर्शनानंतर राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी मंगळवारी संध्याकाळी भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. राज्यपालांच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर बिरेन सिंह यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, नागा पीपल्स फ्रंटच्या जॉय कुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.