मतदानसक्तीच हवी!

0

मुख्यमंत्र्यांचा सल्ला : निवडणूक आयोगाला विचार करण्याचे आवाहन

मुंबई : राज्याच्या कायद्यामध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातात, त्यामध्ये मतदान सक्ती करता येईल का, याबाबत विचार करणे आवश्यक आहे. काही लोक धोरणात्मक बाबींवर नेहमी बोलत असतात. परंतु ते मतदानाला जात नाहीत. त्यामुळे मतदान सक्तीचा विचार होणे आवश्यक असल्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे लोकशाही, निवडणुका आणि सुप्रशासन या विषयावर एकदिवसीय परिषद घेण्यात आली होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव यावेळी उपस्थित होते. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी लोकशाही बळकटीकरणाबाबत आपली मते या परिषदेत व्यक्त केली.

गावे स्वावलंबी व्हावीत : राज्यपाल
राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले की, लोकशाही बळकटीकरणासाठी लोकसहभाग असणे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये युवकांना सामावून घेणे काळाची गरज असून, यासाठी वाढत्या मोबाईल वापराचा उपयोग करण्यात यावा, असेही आवाहन त्यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पैशाचा होणार वापर चिंताजनक असून, ते भ्रष्टाचाराचे मूळ आहे. निवडणूक प्रक्रियेत पैशाच्या ताकदीचा वापर वाढला तर सामान्यांचा लोकशाहीवरील विश्‍वास राहणार नाही, असेही मत राज्यपालांनी व्यक्त केले. लोकसहभाग वाढवून लोकशाही प्रक्रिया बळकट करतानाच गावे स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये यासाठी अधिक प्रभावीपणे काम सुरु आहे. महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने उपक्रम राबवण्यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना या दोन राज्यांमध्ये अभ्यासाठी पाठवावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

निवडणूक सुधारणा गरजेच्या!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की लोकशाहीत राष्ट्रीय तसेच समाजहिताच्या मुद्द्यांवर एकमत घडवता आले पाहिजे. निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडणे आवश्यक आहे. निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होतो ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. संविधानाने राज्याला जे अधिकार दिले आहेत, त्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत अधिक सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी. त्या माध्यमातून याबाबत अभ्यास करुन त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. जेणेकरुन कायद्यामध्ये अपेक्षित बदल करणे शक्य होईल, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.