भुसावळ । जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवार 14 रोजी तहसिल कार्यालयात बैठक घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसंदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती जाणून घेत काय उपाययोजना करता येतील याबाबत अधिकार्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी साकेगाव येथील केंद्राची देखील पाहणी केली. तसेच मतदार जागृती अभियानांतर्गत गावागावात मतपत्रिका वाटप करण्यात येणार आहे. यावर मतदानाचे ठिकाण, वेळ, उमेदवारांची माहिती असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ईव्हीएम मशिन सिल करण्यात आल्याने निवडणूकीची संपुर्ण तयारी झाली आहे. तसेच मतदारांना लुभावण्यासाठी वस्तू तसेच दारुचे वाटप करताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस पाटील यांना सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस पाटलांनी गावातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून याची माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना जबाबदार धरले जाईल अशा सुचना देखील जिल्हाधिकार्यांनी दिल्या. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिनाक्षी राठोड, आचारसंहिता कक्ष प्रमुख सुभाष मावळे उपस्थित होते.
चार जणांवर हद्दपारीची कारवाई
निवडणूक काळात काही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या व्यक्तींवर कारवाई सुरु केली असून शहरातील चार जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये जितेंद्र मोरे, सिकंदर सैय्यद, मोहम्मद सलीम खान आणि प्रशांत सोनवणे या चौघांना उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील काही संवेदनशिल गावांमध्ये पोलीस प्रशासनातर्फे पथसंचलन काढण्यात येऊन शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये साकेगाव, कंडारी, कुर्हा पानाचे, वराडसिम या गावांचा समावेश आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच कोंब्रींग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे.
कामगारांना सुटी जाहीर
मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. आणि त्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये त्यादृष्टीने जिल्हाधिकार्यांनी रेल्वे, आयुध निर्माण, दिपनगर तसेच इतर खाजगी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करुन येथील कामगारांना निवडणूकीसाठी सुटी देण्याचे आवाहन केले. मात्र केंद्र शासनाचे प्रकल्प असलेल्या संस्थांमध्ये पुर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसल्यामुळे दीपनगर व रेल्वेत कंत्राटी कामगारांना अर्धा दिवस सुटी तर आयुध निर्माणीमध्ये 2 तासांची सुटी दिली जाणार आहे. तसेच खाजगी संस्थांमध्ये परिपत्रक देण्यात आले आहे. तर ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत. त्या शाळांना 15 आणि 16 असे दोन दिवस बंद ठेवण्याच्या सुचना देखील जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
उपद्रवी केंद्रावर विशेष नजर
तालुक्यातील नऊ गावांमध्ये एकूण 41 उपद्रवी मतदान केंद्र आहेत. यामध्ये काही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनातर्फे विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच एसआरपीसह इतर पथक देखील नियुक्त केले जाणार असल्यामुळे या केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.