मतदानासाठी सुटी किंवा दोन तासांची सवलत द्यावी

0

धुळे । विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता धुळे जिल्ह्यातील दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी दोन तासांची सवलत द्यावी, असे परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने काढले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

या पार्श्वभूमीवर उपरोक्त मतदान क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांनी आपल्या आस्थापनांमधील पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झालेल्या कामगारांना सदर निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी (विशेष नैमित्तिक रजा) देण्यात यावी. मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशा आस्थापनेतील, उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम, अखंडित उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यांमधील पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झालेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी, असेही या आदेशात नमूद केले आहे.

योग्य संधी प्राप्त करुन द्या
उपजिल्हा निवडणूक अधिकारी वळवी यांनी म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने नाशिक मतदार क्षेत्रातील रिक्त पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून सदर क्षेत्रामध्ये 3 फेब्रुवारी 2017 रोजी निवडणूक होणार आहे. उपरोक्त निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने व सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.