दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशने (एआयपीडीए) मतदान करणार्या ग्राहकांना इंधनावर प्रतिलिटर 50 पैशांची सूट देणार असल्याची घोषणा केली आहे.
लोकांनी जास्तीजास्त संख्येने मतदान करावे म्हणून पहिल्यांदाच एआयपीडीए ही सवलत देणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांना या सवलतीचा लाभ घेता येईल. ज्यांच्या बोटावर मतदानाची शाई असेल केवळ त्यांनाच या सवलतीचा लाभ घेता येईल असे एआयपीडीएचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी स्पष्ट केलं आहे. ही सवलत फक्त 20 लिटरपर्यंतच घेता येईल. त्याहून जास्त इंधन भरल्यास ही सवलत मिळणार नाही. ही सवलत कोणतीही तेल कंपनी देणार नसून पेट्रोल पंपांचे डीलर्स देणार आहेत. मतदानाबद्दल जागृती करण्यासाठी एआयपीडीएने हे पाऊल उचलले आहे.’ अशी माहिती बन्सल यांनी दिली आहे.