नवापूरमधील सलून चालकाचे अभिनव उपक्रम
नवापूर: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अधिकाधिक नागरिकांना मतदान करावे असे आवाहन केले जाते. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात एक अभिनव प्रयोग दिसून आला. जो मतदान करणार नाही त्याची दाढी कटिंग करणार नाही असा संकल्प नवापूर येथील एका सलून चालकाने केला आहे. जो मतदार मतदान करून आल्यावर बोटाला लागलेली शाही दाखविल्यावर ५० टक्के सूट देत आहे.
नवापूर शहरातील डॉ. बाबासाहेब चौका समोरील साई सलूनचे चालक जितेंद्र भदाणे व राकेश भदाणे या दोघ बंधुनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जनजागृती करण्यासाठी अनोखा प्रयोग केला. दुकान उघडण्यापूर्वीच 7 वाजता मतदान करून सलून सुरू केले. जे ग्राहक मतदान करून येतात त्यांना जितेंद्र भदाणे व राकेश भदाणे 50 टक्के सूट देत आहेत. त्यामुळे, त्यांच्या हेअर कटिंग सलूनवर ग्राहकांची गर्दी झाली. सोबतच, मतदान करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती सुद्धा झाली.