भुसावळ । मतदान केंद्रात प्रक्रिया सुरु असताना येथील कर्मचार्यांनी पूर्णपणे दक्षता बाळगणे आवश्यक आहे. काही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित अधिकार्यांशी लागलीच संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच इव्हीएम मशिन मिळाल्यानंतर तिची काळजीपूर्वक हाताळणी करावी, त्यावर काही अवजड वस्तू ठेवण्यात येऊ नये मतदान केंद्रात मशिन नेऊन त्याठिकाणी सर्व पडताळणी करण्यात येऊन योग्य ठिकाणी मशिन ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, प्रवेशद्वार तसेच खिडीकीपासून काही अंतर असावे, मतदान करीत असताना ते गुप्तपणे होण्यासाठी मशिनच्या बाजूला काही झडप लावण्यात यावी जेणेकरुन गुप्तता पाळण्याच्या सुचना केल्या. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी दिला.
मतदान केंद्राविषयी केले मार्गदर्शन
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार मिनाक्षी राठोड, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, नायब तहसिलदार पी.बी. मोरे, संजय तायडे, एस.एस. निकम, नायब तहसिलदार निकम उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात पावर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे स्क्रीनवर संपूर्ण प्रात्याक्षिके दाखवून मुद्देनिहाय सर्व प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगतांना मतदान सुरु होण्यापूर्वीची तयारी, मतदान केंद्राची उभारणी, मतदान केंद्राची रचना या विषयी माहिती दिली.
130 पथक कार्यरत
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन गट व सहा गणांच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कर्मचार्यांना पांडूरंग टॉकीज येथे प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा शनिवार 11 रोजी पार पडला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिनाक्षी राठोड यांनी निवडणूक कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. तसेच मतदान केंद्रात एव्हीएम मशिन कशी जोडणी करावी या संदर्भात कर्मचार्यांना प्रोजेक्टरच्या सहाय्याने तसेच प्रात्यक्षिक करुन माहिती दिली. तसेच कशा पध्दतीने नागरिकांकडून मतदान करुन घ्यावे याची सुध्दा माहिती देण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत 130 पथक कार्यरत करण्यात आले आहे. या पथकात प्रत्येकी सहा कर्मचार्यांचा समावेश राहील. असे एकूण 780 कर्मचार्यांची निवडणूकीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये चार निवडणूक निरीक्षकांवर एक केंद्राध्यक्ष अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर मतदान प्रक्रियेसंदर्भात काही महत्वपुर्ण बाबींची पुर्तता करण्याच्या सुचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिनाक्षी राठोड यांनी दिल्या.
15 टेबलवर मशिन सिलींग
या प्रशिक्षण वर्गात सर्व उपस्थित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र प्रत्यक्ष हाताळून येणार्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. तर यावल रस्त्यावरील शासकीय गोदामात इव्हीएम मशिन सिल करण्याची प्रक्रिया सकाळी 10 वाजेपासून सुरु करण्यात आली. याठिकाणी 15 टेबलवर प्रत्येकी 3 कर्मचारी याप्रमाणे पथक तयार करुन मशिनची तांत्रिकरित्या तपासणी करुन तीला सिल करण्यात आले. यावेळी तलाठी, लिपीक, मंडळ अधिकारी, कोतवाल, शिपाई यासह नगरपालिकेचे कर्मचारी मिळून 100 च्यावर कर्मचार्यांनी यासाठी परिश्रम घेतले. तसेच गोदामात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त राखण्यात आला आहे.