केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
– बुधवारी ४९ मतदान केंद्रांवर होणार पुन्हा मतदान, गुरुवारी मातमोजणी
मुंबई – मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्याचा फटका अखेर भंडारा-गोंदिया मतदारसंघात बसला आहे. यंत्र बंद पडल्यामुळे भंडारा -गोंदिया मतदार संघात ४९ मतदान केंद्रावर बुधवारी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. पालघर आणि भंडारा – गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले, मात्र या मतदानात अनेक ठिकाणी मतदान यंत्र नादुरुस्त झाल्याने फेरमतदान घेण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली होती . तर अनेक ठिकाणी मतदान यंत्र दोन तासांहून अधिक वेळ बंद असल्याने आवश्यक त्या प्रमाणात मतदान झाले नाही .त्यामुळे मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडलेल्या ४९ ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
भंडारा-गोंदिया मतदार संघातल्या २१४९ मतदान केंद्रांपैकी ४९ केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे. या मतदार संघात ४११ व्हीव्हीपॅट मशीन असून ४९ मतदान यंत्र (EVM ) बंद पडल्याचा अहवाल देण्यात आला आहे. या ठिकाणी दोनदोन तास मतदान यंत्र नादुरुस्त असल्याने मतदानाचा वेग मंदावला असल्याचा अहवाल ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आला असल्याने फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. भंडारा इथे १४, साकोलीत ४, तिरोडा येथील ८, अर्जुनी मोरगाव इथल्या ०२ तर गोंदिया इथल्या २१ मतदान केंद्रावर हे फेरमतदान होणार आहे.
गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांची केली तडकाफडकी बदली
दरम्यान भंडारा -गोंदिया मतदान प्रक्रियेत बाधा आल्या प्रकरणी गोंदियाचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या जागी तडकाफडकी, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी कादंबरी बलकवडे यांची नियुक्तीही करण्यात आली आहे . दरम्यान भंडारा सह पालघर ,मध्येही मतदान यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ उडाला होता. राजकीय पक्षांनी पालघर मध्येही फेर,मतदान घेण्याची मागणी होत होती . मात्र पालघर मध्ये आयोगाने ठरवून दिलेल्या कालावधीत नादुरुस्त मतदान यंत्र बदण्यात आली होती .तसेच त्याची दुरुस्तीही तात्काळ करण्यात आल्याचा अहवाल संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाला दिला आहे .