मुंबई । राज्यातील सत्तेत सहभागी असूनही राज्यमंत्र्यांचा अधिकार न देणे आणि मतदारसंघातील विकासकामांसाठी तुटपुंजा निधी मंजूर करणे आदी प्रश्नांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावर भाजप आमदारांप्रमाणेच शिवसेनेच्या आमदारांना विकास निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन देत पुरवणी मागण्यात तशी तरतूद केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेने सहभागी झाल्यानंतर जवळपास अडीच वर्षे झाली, तरी शिवसेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक विकास निधी कमी प्रमाणात मंजूर करण्यात येत होता तसेच 5 राज्यमंत्र्यांनाही फारसे अधिकार देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर मतदारसंघातील विकासकामांच्या अनुषंगाने एखादा प्रस्ताव भाजपच्या मंत्र्यांकडे सादर केल्यास त्यास मंजुरीही देण्यात येत नव्हती. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार आणि राज्यमंत्र्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
यापूर्वीही या सर्व आमदारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावेळीही या तक्रारींचे निरसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.
सरकारमध्ये सहभागी असूनही आमदारांची कामे होत नाहीत तर राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीत. त्यामुळे शिवसेनेमधील वाढती नाराजी लक्षात घेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्री निवासस्थानी सर्व शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व आमदार आणि राज्यमंत्र्यांनी आपल्या अडचणी मांडल्यानंतर या नाराजीची तत्काळ दखल घेवून त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आदेश दिले. तसेच नेहमी पक्षाच्या प्रश्नी बोलण्यासाठी केवळ तुम्ही कॅबिनेट मंत्रीच न जाता सर्वांना सोबत घेवून जा, असे आदेश सर्व कॅबिनेट मंत्र्यांना देत हे प्रकरण गांर्भियाने हाताळण्याचा दम भरल्याची माहिती शिवसेनेच्या एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे आता निधी मिळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.
सेनेचे शिष्टमंडळ ‘वर्षा’वर
शिवसेनेच्या आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम आणि दीपक सावंत यांना आदेश देत याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊून तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री, राज्यमंत्री आणि आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आमदारांची नाराजी मांडली.
याबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांना ज्या प्रमाणात विकास निधी मिळतो. त्याचप्रमाणात शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळावा, अशी प्रमुख मागणी होती तसेच अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दलही नाराजी होती. त्या सर्व दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.