बारामती (वसंत घुले) : बारामती विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळणार नाही. मी महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून कोठूनही अर्ज भरू शकतो, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे नुकतेच केले होते. बारामतीमधील बदलते राजकारण तसेच महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांमध्ये मतदारसंघांसाठी चाललेल्या वादाविषयी दैनिक जनशक्तिने यापूर्वी विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मग बारामतीतून उमेदवार कोण?
आमदार अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बारामतीतील विधानसभेच्या उमेदीवारीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी अजित पवार हे कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार या विषयी तर्कवितर्क लढविले जात होते. मग बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कोण असणार? या विषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बारामतीत दुसर्या फळीतील कार्यकर्ते प्रश्न विचारत आहेत की, आमचे राजकीय भवितव्य काय? आम्ही केवळ सतरंज्याच उचलणारे कार्यकर्ते आहोत का? आम्हाला केवळ सहकार क्षेत्रातील दुय्यम दर्जाची पदे मिळणार का? आम्ही केवळ त्यावरच समाधान मानायचे का? बारामतीकर या प्रश्नांच्या उत्तराची प्रतीक्षा किती दिवस करायची? अशी चर्चा बारामतीत सध्या जोरदार सुरू आहे.
विदर्भातून निवडणूक लढवतील का?
बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जेष्ठ कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अजित पवार सांगतात की, महाराष्ट्रातून कोठूनही निवडणूक लढवेन. परंतु, पक्षाला विदर्भात कोणताच जनाधार नाही. मग पवार विदर्भातून निवडणूक लढवतील का? लढवली तरी ते यशस्वी होतील काय? असा प्रश्न या कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे. मतदारसंघामुळे निर्माण झालेल्या कुटुंबकलहाच्या या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत. बारामतीतील राजकारणाविषयी सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होत असते. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही चर्चा कमी होऊ लागली आहे. बारामतीत गेल्या दहा वर्षांत पवारांच्या राजकारणाला सरासरी तालुक्यात 46 टक्के विरोधी सूर आहे हे मागील निवडणुकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. याचा धसका प्रस्थापितांनी घेतलाच आहे. गत लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे कशाबशा काठावर निवडून आल्या. यावरून बारामतीच्या राजकारणाची झलक दिसून येत आहे.
शिक्रापूर येथील खुलासा बारामतीत का नाही?
बारामतीतील सहकारी साखर कारखानदारी किंवा काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक असो, अन्य छोट्या-मोठ्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे अर्थपूर्ण रसदही पुरवावी लागते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विकासावरचा जनाधार कुठे गेला? हा प्रश्न पडतोच. अजित पवारांनी दैनिक जनशक्तिने केलेल्या मांडणीवर शिक्रापूर येथे खुलासा करावा. हे महत्वाचे आहे. कारण, पवारांना बारामतीतही याचे स्पष्टीकरण देता आले असते. मात्र, त्यांना त्यासाठी दुसरीकडेे जागा शोधावी लागली यातच बरेच काही सांगून जाते. दैनिक जनशक्तिने बारामतीच्या राजकारणावर सडेतोड व स्पष्ट भूमिका मांडली होती. जनशक्तिने वास्तवता मांडल्याच्या प्रतिक्रियाही त्यावेळी वाचकांनी व्यक्त केल्या होत्या.