शहर काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण
पिंपरी : युपीए सरकारच्या कार्यकाळात भारत देश हा गहू , तांदूळ, कापसाचा जगातील दोन नंबरचा निर्यातदार देश होता. मागील चार वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे शेती विकास उणे दोन टक्क्यांवर आला आहे. सतरा कोटींपेक्षाही कमी मतदारांचा कौल मिळाला असतानाही भाजप सत्तेवर आहे. याचे मोदी आणि अमित शहा यांनी भान ठेवावे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी दिला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहर काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम तावडे, महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जयस्वाल, माजी नगसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शाम आगरवाल, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, सर्ज्जी वर्की, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, शहर सरचिटणीस ड. क्षितीज गायकवाड, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी आदींसह शहर काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दलितांचे हक्क बदलण्याचा हेतू
रत्नाकर महाजार पुढे म्हणाले की, स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी दूरदर्शन, दूरसंचार, संगणक आणि दळणवळण क्षेत्रांची पायाभूत उभारणी केली. त्याच गोष्टीचा पुरेपुर गैरवापर करुन दिशाभूल करणारी खोटी प्रलोभने दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. तेच आता काँग्रेसने पासष्ट वर्षात काय काम केले असे नागरिकांची दिशाभूल करणारे प्रश्न उपस्थित करतात. भाजपाने मागील चार वर्षांच्या कार्यकालात दलित, महिला, अल्प संख्याकांवर दहशत पसरविण्याचे काम केले. दलितांचे हक्क, रक्षण करणारे कायदे बदलण्याचा हेतू आहे. गुजरात उना येथे गौहत्याच्या खोट्या घटनेत दलितांना मारुन टाकले जाते. उत्तर प्रदेशात दलित तरुणाने घोडेस्वारी केली म्हणून त्याचा बळी घेण्यात आला. सरकारच्या फसलेल्या धोरणांविरुध्द बोलणार्यांचे बळाने, ताकदीने तोंड बंद करण्यात येते.