मतदारांच्या ‘अर्थपूर्ण’ भेटीगाठी

0

नंदुरबार । शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून मतदारांसाठी रंगीत, संगीत ओल्या सुक्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत, काही उमेदवारांनी तर मतदार असलेल्या गुरुजींना भेट वस्तू देखील वाटप करण्याचा आटापिटा सुरू केला आहे, मात्र काही मतदारांनी भेट वस्तू नाकारत ती चक्क जाळल्याचा कारनामा केल्याने हा विषय फारच चर्चेत आला आहे. निवडणूक म्हटली म्हणजे मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखवणे, ओल्या सुक्या पार्ट्यांची मेजवानी देणे,एखादी भेटवस्तू देऊन आकर्षित करणे असे प्रकार अन्य कोणत्याही निवडणुकीत दिसून येतो,मग याला शिक्षक मतदार संघाची निवडणूक कशी बरं अपवाद ठरणार? जे इतर निवडणुकीत घडते ते शिक्षकांच्या निवडणुकीत देखील घडत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जाते आहे.

गुरूजीही अपवाद नाहीत
ओल्या सुक्या पार्ट्या पासून तर लक्ष्मी दर्शन देण्यात येत आहे, काही उमेदवारांनी तर मतदारांना साड्यांचा आहेर दिला जात आहे. हा आहेत काहींना पचनी पडत नसल्याने ते मतदार साड्या जाळत असल्याचा प्रकार करत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील मतदार संघात हे दृश्य दिसत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जाते आहे. गुरुजी म्हटला म्हणजे गरीब प्राणी असे म्हटले जाते,पण ही परिस्थिती आता राहिली नाही. विविध निवडणुकीच्या माध्यमातून गुरुजी अस्सल राजकारणी बनत चालला आहे. याला काही गुरुजी अपवाद असू शकतात,त्यामुळेच की काय या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक पार्श्‍वभूमीवर चक्क शाळेच्या आवारातच पार्ट्या देण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

16 उमेदवार रिंगणात
या निवडणुकीत भेट वस्तू, लक्ष्मी दर्शन,आणि पार्ट्या यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे, असे असले तरी या निवडणुकीतील मतदार हा हुशार आणि मोठा चलाख आहे,तो कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो हे 25 जूनच्या निवडणुकीत दिसून येणार आहे,नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत, असे असले तरी खरी लढत तीन उमेदवारांमध्ये रंगली आहे,त्यात भाजपाचे उमेदवार अनिकेत पाटील,शिक्षक लोकशाही आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे, शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा समावेश आहे, या निवडणुकीत अल्पसंख्याक विरुद्ध मराठा लढत असा ही प्रचार केला जात असल्याने निवडणुकीत कमालीची चुरस वाढली आहे,