मतदारांनी देशातील अस्थिरता व नैराश्य संपविले: राष्ट्रपती

0

नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील जनतेने मोठा जनादेश देत सरकार निवडले. त्यामुळे देश अस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या वातावरणातून बाहेर आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला राष्ट्रपतींनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी सर्व मतदार, नवनिर्वाचित खासदार आणि लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या निवडणूक आयोग, प्रशासन आणि सुरक्षा दलांचेही त्यांनी अभिनंदन केले.

लोकसभा निवडणुकीत ६१ कोटी नागरिकांनी मतदान केले आणि नवा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली होती, त्यांनी पुरुषांच्या तोडीने मतदान केले. १७व्या संसदेत जवळपास निम्मे खासदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. तसेच यावेळी ७८ महिला खासदार निवडून येणे ही भारताची नवी प्रतिमा दाखवते असे राष्ट्रपती म्हणाले.

सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या विचाराने काम करीत आहे. पहिल्यांदा कोणत्याही सरकारने छोट्या दुकानदारांच्या आर्थिक सुरक्षेकडे लक्ष दिले आहे. कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत छोट्या दुकानदारांसाठी आणि रिटेल व्यावसायिकांसाठी एक वेगळी पेन्शन योजनेला आम्ही मंजुरी दिली. या योजनेचा लाभ देशातील सुमारे ३ कोटी छोट्या दुकानदारांना मिळेल, असा सरकारला विश्वास असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारने शेतकरी, जवान आणि गरीबांसाठी आणलेल्या नव्या योजनांचा उल्लेख केला. देशातील जल संकटाचा उल्लेख करीत राष्ट्रपती म्हणाले, येत्या काळात जलसंकट वाढू शकते. त्यावर मात करण्यासाठी जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्याचे निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. दुष्काळाच्या समस्येवरही केंद्र सरकार जागृत असल्याचे यावेळी राष्ट्रपती म्हणाले.