मतदार दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात 1630 मतदान केंद्रस्तरावर विविध कार्यक्रम

0

धुळे । आठव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नंदुरबार येथे होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्‍वनी कुमार उपस्थित राहतील. धुळे जिल्ह्यात 15 लाख 55 हजार 233 मतदार आहेत. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता नगाव, ता. जि. धुळे येथील गंगामाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे , जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, नायब तहसीलदार प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गावातून युवा मतदारांची रॅली काढणे, मतदार नोंदणी, मतदानाबाबत प्रबोधन करणे, गावागावात पथनाट्याचे आयोजन करणे, नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र समारंभपूर्वक प्रदान करणे, सहस्त्रक मतदारांचा गौरव करणे, अपंग मतदारांचा सन्मान, ऑक्टोबर- डिसेंबर 2017 मध्ये मतदार नोंदणी झालेल्या मतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप करणे, महिला मतदार नोंदणीसाठी आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्राचे वितरण करणे, आदी कार्यक्रम होतील.

आठवा राष्ट्रीय मतदार दिवस
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. यादिनानिमित्त संपूर्ण देशात 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेला 2011 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त भारत निवडणूक आयोगाने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. तेव्हापासून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षाचा राष्ट्रीय मतदार दिवस आठवा राष्ट्रीय मतदार दिवस असल्याचे सांगितले.

सुलभ निवडणूका
प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी करावी आणि प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा,असा भारत निवडणूक आयोगाचा संकल्प आहे. तोच हेतू राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा आहे. आठव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भारत निवडणूक आयोगाने अपंगांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी नियोजन केले आहे. यानिमित्त राष्ट्रीय मतदार दिवसाचे घोषवाक्य सुलभ निवडणुका असे आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा, तालुका आणि जिल्ह्यातील 1630 मतदान केंद्रस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.