विशेष मोहीमेंतर्गत 42 हजार 804 अर्ज प्राप्त
पुणे : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत मतदार नाव नोंदणी, नाव-पत्त्यांमधील बदल आदींसाठी 42 हजार 804 अर्ज प्राप्त झाले आहेत. विभागामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
केंद्रीय निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने 23 व 24 फेब्रुवारी आणि 3, 4 मार्चला विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित होते. या विशेष मोहिमेमध्ये 18 ते 19 वयोगटामध्ये युवा मतदारांचे नाव नोंदणीसाठी 9 हजार 177, तर 19 वर्षांवरील वयोगटासाठी मतदार नोंदणीसाठी 28 हजार 175 असे 37 हजार 352 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. ऑनलाइन पद्धतीनेही नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रावर जाऊन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होती. या सर्व अर्जांची पडताळणी करून त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मतदार 74 लाख
शहरात नुकत्याच राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानातील अर्जांसोबतच सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून मतदार नोंदणीबाबत येणार्या अर्जांमुळे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील गृहनिर्माण संस्थांमधील मतदार अर्जांची संख्या आठ हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाखांवर पोहचणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट, कसबा पेठ, वडगाव शेरी, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे त्यांच्या संस्थांमधील पात्र सभासदांची नावे यादीत समाविष्ट करण्याबाबत जबाबदारी दिली होती. त्यामुळे मतदारांची संख्या वाढणार असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली.