मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

0

नंदुरबार । भारत निवडणुक आयोगाकडुन जे पात्र व प्रथम मतदार आहेत परंतु काही कारणाअभावी त्यांचा मतदार यादीत समावेश झाला नाही (18 ते 21 वर्ष) अशा मतदाराचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना भारत निवडणुक आयोगाने दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकानुसार दिली आहे. ही विशेष मोहिम 1 ते 31 जुलै, या कालावधीत राबविण्यात येणार असुन या कालावधीत नमुना नं. 6 स्विकारण्यात येणार आहेत. नमुना नं. 6 मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे स्विकारण्यात येतील.या विशेष मोहिमेअंतर्गत 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नमुना नं.6 गोळा करणे, तसेच 18 ते 19 वयोगटातील व्यक्तीकडुन नमुना नं. 6 भरुन घेतील. तसेच निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये मतदार म्हणुन नोंदणीपासुन वंचित राहिलेल्या पात्र नागरीकांची प्रथमच मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असणार्‍यांची नोंद करण्यात येणार आहे.