भुसावळ। निवडणूकीच्या कामकाजासाठी शासनाने नव्याने ईआरओ- नेट सॉफ्टवेअर सुरु केले आहे. याद्वारे मतदार याद्यांसह यातील दुरुस्तीचे काम करणे सोयीचे व सोपे होईल त्यामुळे त्यामुळे निवडणूक कर्मचार्यांनी हे नविन तंत्रज्ञान अवगत करण्याचे आवाहन तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी केले. येथील नविन तहसीलदार कार्यालयातील सभागृहात शनिवार 20 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ विधानसभा मतदार संघातील पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व निवडणूक विषयक कामकाज पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांना ईआरओ – नेट यांना सॉफ्टवेअरबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
भारत निवडणूक आयोग यांनी नविन मतदारांचे नावे वाढविणे फॉर्म नंबर 6 बाबत ईआरओ – नेट हे नविन सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. यापुढे निवडणुकीचे कामकाज ईआरओ – नेट या सॉफ्टवेअरमध्ये करावयाचे असल्याने भारत निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या सुचनेनुसार सर्व भुसावळ तालुक्यातील बीएलओ, पर्यवेक्षक व निवडणूकीचे कामकाज पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांना नविन तहसिलदार कार्यालयातील सभागृहामध्ये प्रोजेक्टरद्वारे प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तहसीलदार मिनाक्षी राठोड – चव्हाण, महसूल नायब तहसीलदार पी.बी. मोरे व निवासी नायब तहसीलदार एस.यु. तायडे आदी उपस्थित होते.
अर्ज भरण्यावर मार्गदर्शन
ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत नाव, पत्ता आदी चुकीचे आहे. त्याचे संशोधन लवकरात लवकर करण्यात यावे, यामध्ये एकाही मतदाराचे नाव सुटायला नको, ज्या मतदारांचे दोन मतदान कार्ड बनले आहे. त्यांचे नाव ट्रेस करुन एक मतदान कार्ड देण्यात यावे. मतदार यादीत नाव जोडण्यासाठी एका विधानसभा क्षेत्रातून दुसर्या ठिकाणी स्थानांतरणासाठी अर्ज क्रमांक 6 भरण्यात यावा, कुण्या मतदाराचे नाव जोडण्यात आल्यास आपत्ती संबंधात आणि मतदार यादीत नाव सहभागी करण्यासाठी अर्ज क्रमांक 7 भरण्यात यावे. विधानसभेत एक मतदान केंद्र दुसर्या केंद्रात स्थानांतरण करण्यासाठी अर्ज क्रमांक 8 ‘क’ भरु शकतात.