भुसावळ। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्या निवडणूकीची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रकाशीत केली जाईल. तसेच संकेतस्थळावर आता पर्यंत नोंद असलेली मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मतदार नोंदणी कार्यक्रम जाहिर झाल्यापासून आजतागायत ही सर्व माहिती, यादी, सूचना अद्याप संकेतस्थळावर दिसत नाही. त्यामुळे आधी नोंदणी केलेल्या तसेच नव्याने नोंद करु इच्छिणार्या पदवीधर मतदारांचा संभ्रम वाढत असल्यामुळे यासंदर्भात प्रा. पंकज पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, निवडणूक निर्णय अधिकार्यांना पत्र पाठविले आहे.
नोंदणीची वेळ मर्यादा वाढवावी
विद्यापीठ मतदार नोंदणीची पद्धीती हि अतिशय क्लिष्ट स्वरुपाची आहे. स्कॅन केलेले फोटो आपण दिलेल्या मर्यादेत अपलोड करणे अवघड जात आहे. शिवाय कलर डिग्री सर्टीफिकेट इमेज टू पीडीएफ करणे तंत्रज्ञानात पिछाडीवर असलेल्या ग्रामीण भागातील पदवीधरांना गुंतागुंतीचे झाले आहे. शिवाय आपण 12 रुपये नोंदणी शुल्क ठेवलेले असून यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. शिवाय अपलोड केलेला फॉर्म आपण प्रिंट काढून विद्यापीठात जमा करणे जळगाव विभाग सोडून नोकरीसाठी बाहेर गेलेल्या पदवीधरांना अडचणीचा ठरत आहे. यासंदर्भात त्वरीत यावर उपाययोजना कराव्यात. पदवीधर मतदान नोंदणी पासून वंचित राहिल्यास याला सर्वस्वी जबाबदार हि क्लिष्ट नोंदणी पद्धती ठरू शकते. तसेच काही दिवस नोंदणीची वेळ मर्यादा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.