मुंबई । राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष पुर्ननिरीक्षण आणि बीएलओच्या कामांसाठी अधिग्रहीत करण्यात येत आहे. त्यामुळे शाळांचे कामकाज कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. याबाबत मंगळवार आमदार कपिल पाटील यांनी दिल्ली येथे भारत निर्वाचन आयोगाचे प्रधान सचिव एन.एन. भुटोलिया आणि के. एफ. विल़्फ्रेड यांची भेट घेतली. मतदार याद्यांचे पुर्ननिरिक्षण आणि बीएलओच्या अशा निरंतर चालणार्या कामांतून शिक्षकांची मुक्तता करावी याबाबत निवेदन दिले. सरल नोंदणी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकक्ष मूल्यमापण नोंदी, शाळासिद्धी, स्टुडन्टस् पोर्टल, पायाभूत चाचणींच्या गुण नोंदी अशा विविध कामांमुळे यापूर्वीच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेजार झाले आहेत.
ऑनलाईन कामांवर बहुतांश वेळ वाया जाऊ लागल्याने मुलांच्या शिकवण्यावर त्याचा परिणाम होत आहे. शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षकांना मतदार याद्यांचे पुनरिक्षणाचे काम देऊ नये अशी शिक्षक भारतीची मागणी आहे.
शिक्षण हक्क कायदा आणि संविधानातील तरतुदी यानुसार सार्वत्रिक निवडणूक आणि राष्ट्रीय जनगणना या व्यतिरिक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक काम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना बंधनकारक नाही. त्यामुळे मतदार याद्या पुनरिक्षण, सर्वेक्षण, याद्या तयार करणे, बीएलओ अशी कोणतीही निरंतर चालणारी कामे शिक्षकांनी स्विकारु नयेत.
– कपिल पाटील, आमदार