मतदार याद्यांमध्ये मयत व स्थलांतरीतांची नावे अद्यापही कायम

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील विविध गावांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाले असून मयतांची नावे तर वगळणे दूरच पण एकाच मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या मतदार संघात असणे, दोन किंवा त्यापेक्षा अधिक निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणे, बाहेरगावी कायमस्वरुपी राहणार्‍यांचे मतदार यादीत नाव समाविष्ट असणे, यासारखे प्रकार आढळून येत आहे. तालुक्यातील केवळ राजुरा गावाचा अभ्यास केला असता जवळपास 200 मतदारांच्या नावे व अन्य बाबतीत घोळ दिसून येत असल्याने संपूर्ण मतदार संघात किती घोळ असेल, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

याद्या अद्ययावतीकरणास लवकरच सुरुवात
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाची 2014 ची निवडणूक झाल्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर मतदार नोंदणी व जुन्या मतदार याद्यांना पुनर्मुद्रित करण्यात येणार आहे. मतदार याद्या आयोगासाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असल्यातरी मुक्ताईनगर मतदार संघात मात्र कोणतीही विशिष्ट तक्रार समोर येत नाही.

शेमळदे येथे 118 स्थलांतरणाची नावे कायम
यामध्ये तालुक्यातील शेमळदे येथील मतदार यादीतही मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असून बाहेरगावी स्थलांतरीत झालेल्या तसेच मयत मतदारांची नावेदेखील कायम आहे. यामध्ये 118 मतदारांची नावे स्थलांतरीत करण्यात आलेली नाही तर मयत मतदारांमध्ये 16 नावांचा समावेश आहे. यावरुनच तालुक्यातील इतर गावांची तुलना केली असता हा घोळ किती मोठा आहे, हे दिसून येते.

50 मयतांची नावे
राजुरा गावातील मयत मतदार 2014 च्या यादीनुसार 38 आहे. विशेष म्हणजे हे मयत असूनदेखील त्यांची नावे तत्कालीन निवडणुकीत मतदार यादीत नाव होते. ही माहिती महिन्याभरापुर्वी राजुरा गावातून घेण्यात आली असून 2016 मध्ये मतदार यादी अद्ययावत केल्यास मयतांची संख्या वाढली असून ती 2014 च्या निवडणुकीतील मयत मतदार संख्या धरुन 50 च्या घरात पोहचली आहे. निवडणुकीपुर्वी मयत असल्यानंतर सुध्दा त्यांची नावे मतदार यादीतून न वगळण्यामागचे कारण काय, मयत मतदारांचे नावे तर मतदान केले जात नाही ना याचीही चौकशी करण्याची गरज आहे. तसेच गावात न राहणारे व कायमस्वरुपी गावाबाहेर जावून वास्तव करणार्‍या मतदारांची नावेदेखील कायम आहे. विशेष म्हणजे ही नावे दुसर्‍या गावांच्या मतदार यादीतही समाविष्ट आहे.