मतिमंदांच्या शाळेसाठी भाजप आक्रमक

0

जळगाव । उत्कर्ष मतिमंद मुलांच्या शाळेसाठी महानगरपालिकेच्या भाईटे शाळेची इमारत देण्याची मागणी भाजपाचे रविंद्र पाटील यांनी महासभेत केली. याला उत्तर देतांना महापौर लढ्ढा यांनी त्यांना योग्य प्रकारे उत्तर देऊन समाधान केले आहे. अजेंडावर विषय नसल्याने चर्चा करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर रविंद्र पाटील यांनी महासभेत चार वेळा ठराव आले असतांना मतिमंद मुलांना डावलण्यात येत असल्याचा आरोप केला.

खरा वाद जागा जुळवाजळवीचा
महापौर लढ्ढा यांनी महासभेनंतर पत्रकारांना सांगितले की, भाजपा नेते दोन दिवसापूर्वी निवेदन घेऊन आले असता शाळा एक व मागण्या दोन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यावेळी त्यांना नटवर टॉकीजच्या मागील शाळेत दहा रूम आहेत. त्यात शिक्षण मंडळाचे ऑफीस असून ते ऑफीस पडक्या शाळेत स्थलांतरीत करणार असल्याचे सांगितले. तसेच येथे अपंग सेवा मंडळाची गेल्या 20 वर्षांपासून शाळा आहे. यामुळे दोन्ही शाळांना मदत होऊ शकते अशी भूमिका मांडली. या जागेचा त्यांनी स्वीकार करावा असे महापौरांनी स्पष्ट केले. भाजपा सदस्य जिद्द करीत असून अशी जिद्द केल्याने निर्णयच होणार नाही याकडे लक्ष वेधले.

चौकांच्या नामकरणाचा तिढा : एमजे कॉलेज ते भास्कर मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावरील कवयित्री बहिणाबाई उद्यानाजवळील चौकाचे कवयित्री बहिणाबाई चौक असे नाकरणाचा प्रस्ताव सिमा भोळे यांनी मांडला होता. याला हरकत घेत विष्णु भंगाळे यांनी या चौकात महाराणा प्रताप यांचा पुतळा असून याला महाराणा प्रताप चौक नाव देण्याचा ठराव याआधीच पारित झाला असल्याने प्रभात चौकाचे कवयित्री बहिणाबाई चौक नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

महासभेतून सभात्याग ; निषेधाच्या घोषणा
भाजपा सदस्य जागा सोडून महापौरांसमोर जमा झाले होते. सभागृहात गोंधळाचे वातावरण तयार झाल्याने गणेश सोनवणे यांनी भाजपा सदस्यांना उद्देशून सर्वांनी शिस्तीचे पालन करावे असे सांगितले. गोंधळ करणे ही सभागृहाची संस्कृती नसल्याचे सोनवणे सांगत होते. यावर वामनदादा खडके हे तुम्ही तुमच्या जागेवर रहा असे सोनवणे यांना उद्देशून बोलले. यावर सोनवणे यांनी संताप व्यक्त करत दादा मी माझ्या जागेवरच आहे. येथे बसेन किंवा उभा राहील असे उत्तर दिले. महापौर चचेर्र्स तयार होत नसल्याचे पाहून व रविंद्र पाटील यांनी चर्चा आताच व्हायला पाहिजे अशी भूमिका घेतल्याने सभागृहात तणाव वाढला होता. हा तणाव संपूष्टात यावा यासाठी भाजपचे डॉ. आश्‍विन सोनवणे, ज्योती चव्हाण, सुनील माळी, विजय गेही, अ‍ॅड. संजय राणे, खाविआचे श्यामकांत सोनवणे, सुनील महाजन, कैलास सोनवणे यांनी महापौरांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. रविंद्र पाटील यांनी महापौर तुम्ही अध्यक्ष आहात, या मुलांबद्दल काहीच वाटत नाही का, सभागृहात थांबण्याचा काही फायदाच नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. मात्र, महापौर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने भाजप नगरसेवकांनी महासभेवर बहिष्कार टाकत सभात्याग केला व खाविआच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

मतिमंदांचे पालकही सभागृहात धडकले!
भाजपाचे रविंद्र पाटील त्यांची भूमिका मांडताना या मतिमंद मुलांचे पालक सभागृहाच्या बाहेर उभे होते. या पालकांनी सभागृहात प्रवेश करून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळात अधिकच भर पडली. यावेळी महापालिका कर्मचार्‍यांनी पालकांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास बाध्य केले. यानंतर भाजपा सदस्यांनी देखील सभागृहातून सभात्याग केला. उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांसोबत महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी 9.30 वाजेपासून धरणे आंदोलन केले होते. महासभेसाठी येणार्‍या सर्व नगरसेवकांना त्यांनी यावेळी गुलाबपुष्प व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्या हातामध्ये मागण्यांचे फलक होते.

महापौर योग्य अन् सभात्यागही!
दरम्यान, भाजपामध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. भाजपा सदस्य उज्वला बाविस्कर यांनी महिन्यांतून एकदाच महासभा होत असते. विषय आल्यावर चर्चा करता आली असती अशी भूमिका आपल्या सहकार्‍यांसमोर मांडली. परंतु, भाजपा सदस्यांनी सभात्याग केल्यांवर त्यांनी देखील सभागृहातून काढता पाय घेतला. सभात्याग केल्यानंतर भाजपा सदस्य धरणे आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांसोबत जाऊन बसले.