भिगवण। गोड्या पाण्यातील मच्छीमारी व्यवसायाला बळकटी देण्यासाठी राज्य शासानाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्याला 150 ते 200 कोटी मत्स्य बोटुकलीची प्रत्यक्ष आवश्यकता असताना राज्यात केवळ 25 ते 30 कोटीच मत्स्यबीज उत्पादित होत असून पर्यायाने बाहेरील राज्यातून मत्स्यबीज आणावे लागत आहे. त्यामुळे मत्स्यबीजाबाबत महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भिगवण कार्प मत्स्य उत्पादन संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त विधळे बोलत होते. विनोद नाईक, सुहास जगताप, विजय शिखरे, जनक भोसले, भीमाशंकर पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
कृषी विभागाचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न केंद्र व राज्य सरकारचे आहे. त्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा वाटा मोठा आहे. या व्यवसायाच्या वाढीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून नीलक्रांती योजना व इतरही योजना राबविली जात आहे, असे विधळे यांनी सांगितले. राज्यात 25 हजारांपेक्षा अधिक तलाव असून त्यांना मत्स्यबीज पुरवठा करणारी शासकीय व निमशासकीय अशी 46 मत्स्य उत्पादन केंद्र आहेत. मात्र, यातून केवळ 25 ते 30 कोटींचे उत्पादन घेतले जात आहे. हे उत्पादन वाढीसाठी गेल्या दोन वर्षात विशेष प्रयत्न करूनही अपेक्षित वाढ होत नसल्याची खंत विधळे यांनी व्यक्त केली.