उत्तर प्रदेश । मथुरा येथील इनोव्हा गाडी नदीत कोसळून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे 4.30 च्या सुमारास हा अपघात घडला आहे. फतेहपूर येथे गाडी पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट नदीत कोसळली. बचाव पथकासह स्थानिक ग्रामस्थांनी गाडीच्या काचा फोडून मृतदेह बाहेर काढले आहेत. बरेलीतील महेश शर्मा स्वतःच्या परिवारासह मेहंदीपूर बालाजी दर्शनाला जात होते. त्यांना सकाळच्या आरतीतही सहभागी व्हायचे होते. त्यामुळे रात्रीच्या दरम्यान इनोव्हा कार घेऊन राजस्थानच्या मेहंदीपूरमधील बालाजीच्या दर्शनासाठी निघाले. ज्यावेळी कार फतेहपूर पुलावर आली त्याच वेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. अपघातात महेश शर्मा आणि त्यांच्या पत्नीसह 10 लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गाडी चालकाचाही समावेश आहे. स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने गाडीला नदीतून बाहेर काढले. गाडीत 9 जणांचे मृतदेह सापडले, तर चालकाचा मृतदेह नदीतून नंतर काढण्यात आला आहे. गाडी नदीतून बाहेर काढण्यात आली त्यावेळी गाडीचा एक दरवाजा खुला होता. इतर सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. गाडीचालकाने दरवाजा उघडून बाहेर उडी मारली होती. मात्र तो स्वतःचा जीव वाचवू शकला नाही. बाकीचे लोक गाडीत सेंट्रल लॉक असल्याकारणाने दरवाजे खोलू शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.