मुंबई: कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात गरीब व सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना मदत करणण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. मात्र ही मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहेत. राज ठाकरे यांना ही बाब खटकली आहे. सोशल मीडियावरील एका सविस्तर पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर भाष्य करत असे करणार्यांना चांगलेच फटकारले आहे.
‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणे नको असते. पण आज प्रसंगच बाका असल्याने नाईलाजाने अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणार्यांचे फोटो काढणे योग्य आहे का? प्रत्येकाने याचा विचार करावा,’ असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केले आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारसह सर्वसामान्यांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहेत. हातावर पोट असलेले लाखो लोक सरकारच्या, स्वयंसेवी संस्थांच्या व दानशूरांच्या मदतीवरच तगून आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, कॅमेर्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रे काढणे, मदत स्वीकारणार्यास कॅमेर्यात बघण्यास सांगणे अशा चुकीच्या गोष्टी काही लोक करत आहेत. ज्याला आपण मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला लाजवत नाही का? असं करून एखाद्याला शरमेने मान खाली घालायला लावणे कितपत योग्य आहे, असा सवाल राज यांनी केला आहे. महाराष्ट्राची परंपरा निरपेक्ष सेवेची आहे. त्या परंपरेचे दर्शन आपण पुन्हा एकदा घडवूया, असेही त्यांनी म्हटले आहे.