मदत द्या अन्यथा केळी फेकू

0

जळगाव । वादळी वार्‍यामुळे रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या केळी बागांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे़ या शेतकर्‍यांना चार दिवसात प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत द्या, अन्यथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या कार्यालयावर नुकसान झालेली केळी आणून केळी फेक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष सोपान पाटील यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष ललीत बागुल, अ‍ॅड. सचिन पाटील, कल्पना पाटील, कल्पीता पाटील, निला चौधरी, रोहन सोनवणे, अरविंद मानकरी, सुनील कोंड आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांसाठी मदतीची मागणी
वादळी वार्‍यामुळे रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या केळीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेताची पहाणी करण्यासाठी शासकीय यंत्रणेसह जलसंपदामंत्री गिरीष महाजन आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष सोपान पाटील यांनी ना़ महाजन यांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुर्नवसन मंत्री नुकसानग्रस्त केळीची पहाणीसाठी एकदाही का आले नाही अशी विचारणा केली. यामुळे ना़ गिरीष महाजन यांनी सोपान पाटील यांना धक्का बुक्की केल्याचा आरोप सोपान पाटील यांनी केला. त्यांनी शेतकर्‍यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई चार दिवसाच्या आत द्यावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयावर नुकसान झालेली केळी फेकुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे़

भाजपची हुकूमशाही
शहरात संघाचा कुठलाही कार्यक्रम असेल तर चंद्रकांत पाटीलांना तेथे उपस्थित राहण्यास वेळ असतो मात्र, नुकसानाची पहाणी करण्यास वेळ नसल्याचा आरोप कल्पिता पाटील यांनी केला. तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आधी फक्त जामनेरला पाणी पाजवून दाखवावे नंतर बाकी जिल्हाचा व महाराष्ट्राचा विचार करावा असा टोला त्यांनी लगावला. ही भाजपची हुकूमशाही आणि दंडेलशाही आहे.जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजानांचे वागणे हे पोरकटपणाचे आहे. समाधानकारक उत्तर न देता मला धक्काबुक्की केली असा आरोप सोपान पाटील यांनी केला.

ना़ महाजन यांनी राजीनामा द्यावा
भाजप सरकार मधील मंत्र्यांकडून वारंवार शेतकर्‍यांना अपशब्द वापरण्यात येत आहेत. शेतकर्‍यांना धक्का बुक्की करुन हकलून लावले जाते़ शेतकर्‍यांविषयी भाजप सरकारला संवेदना उरलेल्या नाहीत़ म्हणून शेतकर्‍यांशी गैर वर्तन करणार्‍या या मंत्र्यामध्ये थोडीजरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे़